

पुढारी ऑनलाईन डेस्क: पुण्यातील कल्याणीनगरमध्ये मे महिन्यात अल्पवयीन मुलांच्या हातून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वी या अल्पवयीन मुलाला जामीन देण्यात आला. त्यानंतर त्याला अपघात आणि रस्ता सुरक्षा या विषयावर ३०० शब्दांचा निबंध लिहिल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये अल्पवयीन आरोपीने "अपघातानंतर पळून जाण्याऐवजी, अपघातग्रस्तांना मदत करा" असे निबंधात लिहले आहे.
या अपघातात संबंधित अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत कार चालवल्याने अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधिया या दोघांनी जीव गमावला. ही घटना घडल्यानंतर तातडीने या मुलाला अटक करण्यात आली. मात्र न्यायालयात हजर केल्यानंतर या मुलाला न्यायाधीशांनी ३०० शब्दांचा निबंध लिहून दे आणि पोलिसांसह दोन आठवडे काम कर अशी अट घालत जामीन मंजूर केला आहे. यानंतर या मुलाने ३०० शब्दाचा निबंध लिहला आहे. जामीनावर सुटलेल्या अल्पवयीन आरोपीने हा निबंध बाल न्याय मंडळाकडे सादर केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पुणे पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन आरोपी मुलाने रस्ता सुरक्षा आणि अपघात या विषयावर निबंध लिहला आहे. यामध्ये त्याने म्हटले आहे की, 'अपघातानंतर पळून जाण्याऐवजी लोकांनी जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन घडलेल्या प्रकाराची तक्रार करावी. असे न केल्याने लोक अडचणीत येऊ शकतात, असे त्याने म्हटले आहे.
अपघातग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन करून, या अल्पवयीन आरोपी मुलाने "प्रत्येकाने स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक नियमांचे पालन केले पाहिजे, असेही सांगितले आहे.