

पुणे; पुढारी वृत्तसेवा: मुसळधार पावसाने संपूर्ण शहर जलमय झाल्यानंतर खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाकडून तीन अतिरिक्त आयुक्तांनी शहरातील वेगवेगळ्या भागांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. ते यासंबंधीचा अहवाल आयुक्तांना लवकरच सादर करणार आहेत.
रविवारी सायंकाळी मुसळधार पावसाने शहराला झोडपले. साधारण अडीच ते तीन तासांमध्ये सरासरी 62.46 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यात हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत सर्वाधिक 85.09 मिलिमीटर पाऊस पडला. दरम्यान, या पावसाने अनेक भागांत पाणी शिरण्याचे प्रकार घडले, तर अनेक रस्त्यांना ओढ्या-नाल्याचे स्वरूप आले होते. वाहतूक कोंडी होऊन पुणेकरांचे हाल झाले. त्यामुळे महापालिकेच्या कारभारावर टीका होत होती.
अखेर सोमवारी प्रशासनाने या सर्व घटनांचे गांभीर्य ओळखून तीन अतिरिक्त आयुक्तांना वेगवेगळ्या भागांत पावसामुळे झालेल्या परिस्थितीची आणि नुकसानीची पाहणी करून त्यासंबंधीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार, रवींद्र बिनवडे आणि विलास कानडे या तीनही अतिरिक्त आयुक्तांनी शहरातील वेगवेगळ्या भागांतील घटनास्थळांची पाहणी केली.
पूर परिस्थिती नक्की कशामुळे निर्माण झाली, नक्की अतिक्रमण कुठे झाले आहे, नाले वळविण्यात आले आहेत का, यासंबंधीची पाहणी करून प्रत्यक्ष घटनेच्या वेळी पालिकेकडून नागरिकांना मदतकार्य झाले का, यासंबंधीचा अहवाल आयुक्तांना सादर केला जाणार आहे.
या भागात केली पाहणी
अतिरिक्त आयुक्त कानडे यांनी कोथरूड, पाषाण, बावधन यासह इतर भागांत पाहणी केली आहे. तर खेमणार यांनी आज हडपसर, कात्रज, कोंढवा भागाची पाहणी केली. शहरातील इतर ठिकाणांची पाहणी करून पुढील तीन-चार दिवसांत याचा अहवाल सादर केला जाणार आहे.