पुणे : रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची सातारा-पुणे सेक्शनची पाहणी

पुणे : रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची सातारा-पुणे सेक्शनची पाहणी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी बुधवारी पुणे विभागातील सातारा, वाठार आणि जेजुरी स्थानकांची पाहणी केली. यात त्यांनी प्रवाशांच्या सोयी-सुविधांचा आढावा घेत स्थानक, रनिंग रूम, लेव्हल क्रॉसिंग गेट, पॅनल आणि रिले रूम, पूल, रेल्वेमार्ग आदींची पाहणी केली. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवाणी यांनी पुणे विभागातील सातारा सेक्शनची पाहणी केली. या वेळी पुणे विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे, प्रधान विभागप्रमुख आणि पुणे विभागातील शाखाधिकारी उपस्थित होते.

महाव्यवस्थापकांनी सातारा येथे नवीन स्थानक इमारतीला भेट दिली. सातारा येथे त्यांनी स्थानक परिसर, अपघात निवारण वैद्यकीय कोच, लोको पायलट आणि गार्ड कक्षाची व्यवस्था पाहिली. तसेच, रनिंग रूममध्ये उपलब्ध असलेल्या अन्न व पिण्याच्या पाण्याच्या दर्जाची पाहणी केली. तसेच, येथील ट्रॅक्शन सबस्टेशनचीही पाहणी केली. सातारा-वाठार यादरम्यान स्पीड ट्रायल करण्यात आली.

वाठार स्थानक येथे महाव्यवस्थापकांनी स्थानक परिसर आणि रेल्वे कॉलनी तसेच आदर्की ते सालपा यादरम्यानच्या रेल्वे लेव्हल क्रॉसिंग गेट आणि बोगद्याची पाहणी केली. महाव्यवस्थापकांनी जेजुरी स्थानकासह तेथील प्रवासी सुविधा, जेजुरी ते राजेवाडी यादरम्यान मर्यादित उंचीचा भुयारी मार्ग आणि टॉवर वॅगन शेडही कार्यान्वित केली. लालवाणी यांनी आंबळे ते शिंदवणे यादरम्यानच्या पुलाची व वळणाचीही पाहणी केली. पुण्यातील कोचिंग मेंटेनन्स डेपोतील देखभाल दुरुस्तीच्या कामांचीही त्यांनी पाहणी केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news