पुणे : सर्व दवाखान्यांची पाहणी करून अहवाल द्या; आरोग्य प्रमुखांच्या वैद्यकीय अधिकार्‍यांना सूचना

पुणे : सर्व दवाखान्यांची पाहणी करून अहवाल द्या; आरोग्य प्रमुखांच्या वैद्यकीय अधिकार्‍यांना सूचना

पुणे : महापालिकेचे दवाखाने वेळेत न उघडणे, औषधांसाठी बाटल्या उपलब्ध नसणे, डॉक्टरांनी लांबून तपासणी करणे, अशा विविध समस्यांकडे 'पुढारी' पाहणीतून लक्ष वेधण्यात आले. या पार्श्वभूमीवर आरोग्यप्रमुखांनी सर्व वैद्यकीय अधिकार्‍यांना दवाखान्यांची पाहणी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, सर्व दवाखान्यांमध्ये लवकरच बायोमेट्रिक हजेरीची यंत्रणा बसवली जाणार आहे. महापालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये 41 दवाखाने आणि 15 प्रसूतिगृहांचा समावेश आहे.

सामान्य नागरिक तपासणी तसेच औषधोपचारांसाठी दवाखान्यांमध्ये जातात. मात्र, डॉक्टरांची तपासणी, औषधांसाठी बाटली आणण्यास सांगणे, दवाखाने वेळेनंतर उघडणे आणि वेळेआधी बंद होणे, अशा अनेक तक्रारी नागरिकांकडून केल्या जातात. यासाठी 'पुढारी'च्या प्रतिनिधींनी कर्वेनगर, वडगाव, हडपसर, पद्मावती, कात्रज अशा विविध ठिकाणच्या दवाखान्यांमध्ये प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली.

याबाबतचे वृत्त दै. 'पुढारी'मध्ये 18 फेब्रुवारीला प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर आरोग्यप्रमुखांनी सर्व परिमंडल आणि क्षेत्रीय वैद्यकीय अधिकार्‍यांना दवाखान्यांची पाहणी करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार सोमवारी पाहणी करून आरोग्य विभागाकडे अहवाल सादर करण्यात आला आहे. तसेच, दवाखाने वेळेत उघडण्याच्या, रुग्णांना व्यवस्थित तपासण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

आरोग्यप्रमुखांनी काय दिल्या सूचना?
कफ सिरपसाठी मुख्य मेडिकल स्टोअर्समधून लहान बाटल्या मिळवा किंवा उपलब्ध निधीतून खरेदी कराव्यात.
रुग्णांसाठी सर्व शौचालये उघडावीत आणि कर्मचार्‍यांना त्यांची नियमित स्वच्छता करण्यास सांगावे.
सकाळी 9 वाजता उपस्थित नसलेल्या कर्मचार्‍यांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाईल.
रुग्णांना सकाळी 9 ते 1 आणि दुपारी 1.30 ते 5 वाजेपर्यंत औषधोपचार मिळावेत.
सर्व रुग्णांची त्यांच्या लक्षणांनुसार तपासणी आणि उपचार व्हावेत.
दवाखान्यांची दररोज किमान दोनदा स्वच्छता केली जावी.
दवाखान्यांसाठी आवश्यक असलेल्या साधनसामग्रीची यादी तयार करून पाठवावी.

सर्व संबंधित वैद्यकीय अधिकार्‍यांनी आपापल्या भागातील आरोग्य सुविधांना भेट देऊन समस्या सोडवाव्यात आणि लेखी अहवाल सादर करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
                              – डॉ. आशिष भारती, आरोग्यप्रमुख, पुणे महापालिका

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news