

लोणी काळभोर: महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 155 अंतर्गत लेखन प्रमाद दुरुस्तीचे आदेशाव्यतिरिक्त अधिकाराचा गैरवापर करून आदेश झाल्याने अनियमितता झाल्याचे शासनाच्या निदर्शनास आल्याने ज्या अधिकार्यांच्या कार्यकाळात आदेश पारीत झालेत, त्या सर्व तहसीलदारांचा विभागीय चौकशी करण्याचा प्रस्ताव शासनास सादर करण्याचा आदेश अवर सचिव संजय जाधव यांनी विभागीय आयुक्तांना दिल्याने पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूरच्या जिल्हाधिकार्यांना विभागीय आयुक्तांनी 155 ची प्रकरणे तपासण्याचे आदेश दिले आहेत. पुणेजिल्ह्यातील15 तहसील कार्यालयांचे तपासणीचे काम यामुळे सुरू झाले आहे. (Latest Pune News)
अवर सचिव संजय जाधव यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या 155 अंतर्गत अनेक तहसीलदारांनी अधिकार कक्षेच्या बाहेर जाऊन या कायद्याचा दुरुपयोग केल्याच्या अनेक तक्रारी शासनास प्राप्त झाल्याचे नमूद करून मागील दहा वर्षांची प्रकरणे तपासणीनंतर शासनास प्राप्त झालेल्या अहवालानुसार या कायद्यांतर्गत फक्त लेखन प्रमाद दुरुस्तीच्या आदेशाव्यतिरिक्त अधिकाराचा दुरुपयोग केल्याचे दिसत असल्याचे नमूद केले आहे.
नवीन शर्तीचे शेरे कमी करणे, कूळ कायद्यानुसार दखल करण्यात आलेले शेरे कमी करणे, आकारीपडबाबतचे शेरे कमी करणे, वारसाच्या नोंदीबाबत पारीत केलेले आदेश, खरेदी- विक्रीसंदर्भात पारीत करण्यात आलेले आदेश, इतर हक्कातील बोजे कमी केलेले आदेश, इतर हक्कातील पोकळीस्त शेरे कमी केलेले आदेश, इतर कोणत्याही कायद्यानुसार शेरे कमी केलेले आदेश या सर्व दुरुस्ती आदेशांद्वारे अधिकारांचा गैरवापर करून अनियमितता झाल्याचे शासनाच्या निदर्शनास आल्याने वरील आदेश ज्या अधिकारांच्या कार्यकाळात पारीत झाले त्या सर्वांची विभागीय चौकशी करण्याबाबत शासनास प्रस्ताव सादर करण्याचे आदेश शासनाने विभागीय आयुक्तांना दिले आहेत.
पुणे जिल्ह्यातील पंधरा तहसील कार्यलयांत 155 अंतर्गत पारीत करण्यात आलेल्या आदेशाची तपासणी मोहीम सध्या सुरू आहे. यामुळे अनेक तहसीलदारांवर चौकशीचा ससेमीरा मागे लागणार असून, तर विभागीय चोकशीची टांगती तलवार असणार आहे. या आदेशामुळे अनेक तक्रारी शासनाकडे होणार, हे नक्की. चौकशीत प्रकरणे दाबली जाऊन क्लीन चिट देण्याचा प्रयत्न झाला, तरीही नागरिक व ज्यांच्यावर अन्याय झाला ते थेट महसूलमंत्र्यांकडे तक्रारी करणार, हे नक्की असल्याने शासनाच्या या आदेशाने महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.