एक आपण साधू झाले । येर कोण वाया गेले ।।१।।
उठे विकार ब्रम्ही मुळ । अवघे मायेचे गाबाळ ।।धृ।।
माया समुळ नुरे जेव्हा । विश्व ब्रम्ह होईल तेव्हा ।।३।।
ऎसा उमज अादि अंती । मग सुखी व्हावे संती ।।४।।
काम क्रोध मागे सारा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ।।५।।
असे सांगत तत्कालीन समाजाकडून झालेल्या त्रासाला कंटाळून निराश होत झोपडी बंद करून बसणाऱ्या ज्ञानदेवांना उपदेश करत निराशेच्या गर्तेतून बाहेर काढणाऱ्या मुक्ताईमुळेच ज्ञानदेव संत झाले ! आणि त्यांनी जगाच्या कल्याणासाठी पसायदान मागितले.अशा या लहानग्या मुक्ताईचे भगिनी प्रेम पुन्हा जागविण्याचे काम संत. मुक्ताबाई संस्थान, मुक्ताई नगर यांनी केले आहे.
या संस्थानकडून संत मुक्ताईच्या वतीने भाऊ संत ज्ञानेदेवांसाठी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानकडे राखी अर्पण करण्यात आली. बहीण भावाच्या या गोड प्रेमाची परंपरा यंदाही कायम ठेवण्यात आली. इंद्रायणी नदीच्या घाटांनी,सिद्धेश्वराच्या कळसाने,सुवर्ण पिंपळाच्या पानांनी,देऊळ वाड्याने आणि अवघ्या अलंकापुरीने शेकडो वर्षांनंतर हे प्रेम अप्रत्यक्ष रित्या अनुभवले असेच म्हणावे लागेल. पहाटे नित्य पूजा व पवमान अभिषेक झाल्यानंतर सकाळी माऊलींना राखी अर्पण करण्यात आली.
आदिशक्ती मुक्ताई संस्थान, मुक्ताई नगर यांच्या वतीने देवस्थानचे विश्वस्त संदीप पाटील, रविंद्र पाटील व अंकीता पाटील यांच्या हस्ते माऊलींच्या समाधीवर राखी अर्पण करण्यात आली. यावेळी देवस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांच्या हस्ते श्री संत ज्ञानेश्वर माऊलीं तर्फे मुक्ताबाईला साडी चोळी भेट म्हणून देण्यात आली. यावेळी प्रमुख व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर उपस्थित होते.ज्ञानदेवांप्रमाणे निवृत्ती नाथ महाराज,सोपान काका महाराज यांनाही राख्या पाठविण्यात आल्या.