लोणावळा : अरे, कोणीतरी काही करा रे… कोंडतोय माझा श्वास

लोणावळा : अरे, कोणीतरी काही करा रे… कोंडतोय माझा श्वास

लोणावळा(पुणे) : महाराष्ट्राच्या अध्यात्मिक क्षेत्रात अत्यंत पवित्र मानल्या जाणार्‍या इंद्रायणी नदीची सध्याची झालेली, विटलेली अवस्था बघून अक्षरशः ही देवनदी अरे कोणीतरी काही करा रे.. श्वास, कोंडतोय माझा अशी साद घालत असल्याचा पदोपदी भास होत राहतो आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष

लोणावळा शहरात उगम पावणारी इंद्रायणी नदी महाराष्ट्राच्या अध्यात्मिक क्षेत्रात अत्यंत पवित्र मानली गेली आहे. संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज यांची कारकीर्द ज्या आळंदी या आणि देहू गावात घडली ती दोन्ही गावे इंद्रायणी नदीच्या तीरावर बसलेली आहेत. शिवाय इंद्रायणी नदी ज्या भीमा नदीमध्ये जाऊन विलीन होते त्या भीमेच्या काठावरच पुढे श्रीक्षेत्र पंढरपूर वसलेले आहे. अशा या पवित्र नदीची लोणावळा शहरातील दुरवस्था झाली आहे. याकडे लोणावळा नगर परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.

कोरोनामुळे काम थांबले

मानवी शरीरात रक्तवाहिन्या संपूर्ण शरीरात शुद्ध रक्त पुरविण्याचे काम करतात. या रक्तवाहिन्यांना जरा जरी अडथळा निर्माण झाला तर त्याचे भयंकर परिणाम भोगावे लागतात. त्याचप्रमाणे या नद्यादेखील निसर्गचक्रात एकप्रकारे रक्तवाहिन्यांसारखे काम करत असतात; पण शहरातून वाहणार्‍या या नदीची सद्याची परिस्थिती पाहिली असता पुढील काळात कोणत्या भीषण समस्येला तोंड द्यावे लागणार याची कल्पनाच करवत नाही.

स्वच्छतेच्या बाबत संपूर्ण देशात प्रथम क्रमांकाच्या शर्यतीत असलेल्या लोणावळा शहराला इंद्रायणी नदीची दुरवस्था एक डोकेदुखी बनून राहिलेली आहे. यावर कायमस्वरूपी उपाय योजण्यासाठी आणि नदीचा चेहरामोहरा बदलण्याच्या उद्देशाने नगराध्यक्षा सुरेखा जाधव आणि तत्कालीन उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांच्या नेतृत्वाखाली चार वर्षांपूर्वी गुजरात येथे एका अभ्यास दौर्‍याचे आयोजन करण्यात आले होते. गुजरातमधील अहमदाबाद शहरातून वाहणार्‍या साबरमती नदीचा जो कायापालट तेथील प्रशासनाकडून करण्यात आला, तो कशाप्रकारे केला गेला याची सविस्तर माहिती या दौर्‍यात घेण्यात आली. त्यानुसार नदीवर काम करण्याचा निर्णयदेखील घेण्यात आला. मात्र, त्याचवेळी उद्भवलेल्या कोरोना संकटाने सर्व काही जाग्यावरच थांबले गेले.

पावसाळ्यात पूर परिस्थती

आरोग्यविषयक बाबी वगळता प्रत्येक पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्यास तसेच टाटाचे लोणावळा धरण ओव्हरफ्लो झाल्यावर नदीला उतार नसल्याने तसेच नदीपत्रात उथळपणा असल्याने नदी पात्राच्या आजूबाजूस असलेल्या नागरी वस्तीत पाणी जाऊन पूर परिस्थती निर्माण होते. यासाठी नगर परिषद पावसाळ्यापूर्वी विविध उपाय योजना करत असते. मात्र, कायमस्वरुपी उपाय योजना होणे आवश्यक आहे.

नदीमध्ये ठिकठिकाणी जोडले नाले

इंद्रायणी नदीचा उगम लोणावळा नगर परिषद हद्दीजवळील कुरवंडे येथील डोंगरामध्ये आहे. नदी नगर परिषदेच्या हद्दीमधून वलवण गावापर्यंत वाहते. पावसाळया व्यतिरिक्त इतर महिन्यांमध्ये नदीच्या या भागात पाण्याचा प्रवाह नसल्यातच जमा असल्याने नदीमध्ये वाहते पाणी नसते. नदीमध्ये ठिकठिकाणी नाले जोडलेले आहेत. नाल्यांमधून येणारे सांडपाणी नदी पात्रात मिसळले जाते.

नदीत साचला गाळ

नदी पात्राची मोजणी झालेली नसल्याने नदी पात्राची नेमकी रुंदी निश्चित नाही. नदीपात्र खोल नसून उथळ आहे व काही ठिकाणी नैसर्गिक खड्डे असून त्यामध्ये पाणी व गाळ साचलेला असतो. याशिवाय काही ठिकाणी नदी पात्राच्या बाजूने रस्ता, वाहतूक व्यवस्था उपलब्ध नसल्याने नदीतून गाळ काढणे किंवा नदीतून काढलेला गाळ वाहून नेणे इत्यादी बाबी शक्य होत नाही. याशिवाय नदीच्या पाण्यावर डासांचा प्रादूर्भाव होणे, जलपर्णी तयार होणे या बाबी सातत्याने वाढत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. पावसाळा वगळता नदीचे शहरातील पात्र जास्तीत जास्त काळ जलपर्णी खाली झाकली गेलेली असे.

आवश्यक उपाययोजना

  • नदीपात्राचे रुंदीकरण करणे – नदीपात्राची मोजणी करणे आवश्यक आहे. नदी पात्राची रूंदी निश्चित होवून आवश्यक ती खोदाई करुन नदी पात्र रूंद करणे शक्य होईल.
  • नदीपात्रातील गाळ काढणे – नदीपात्राची लांबी 4 किमी व सरासरी रूंदी 15 मिटर आहे. पूरपरिस्थती नियंत्रणासाठी गाळ काढणे.
  • संरक्षक भिंत बांधणे – पूर नियंत्रणासाठी नदीपात्राचे दुतर्फा संरक्षक भिंत बंधन आवश्यक आहे.
  • नाले एकत्रिकरण करणे – शहरातील काही मोठे नाले नदीपात्रात सोडले जातात. त्यामध्ये मुख्य 5 नाले असून त्यांना जोडणे आवश्यक आहे. यात प्रामुख्याने वर्धमान सोसायटी प्रधान पार्क येथून येणारा नाला, भांगरवाडी दामोदर कालनी येथून येणारा नाला, भाजी मार्केटपासून येणारा नाला, कॅप्टन कबाली रोड येथून येणारा नाला, तुंगार्ली भागातून वलवण नांगरगाव रस्त्याखालून येणारा नाला याचा समावेश आहे.
  • जैविक प्रक्रिया करणे – शहरातील नाल्यातून वाहणार्‍या सांडपाण्यावर प्रक्रिया करणे आवश्यक आहे. विविध 7 ते 8 ठिकाणी जैविक प्रक्रिया संरचना उभारणे आहे.
  • नदी सुशोभीकरण करणे – नदी पात्राचे दुतर्फा वृक्ष लागवड व सुशोभिकरण करणे आणि पूर परिस्थती नियंत्रणासाठी वनीकरण करणे आवश्यक आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news