

पुणे : पुढारी वृत्तसेवा : परदेशी विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी 'भारतीय संस्कृती आणि वारसा' या अभ्यासक्रमाची निर्मिती विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात युजीसीने केली आहे. परिचय, प्रमाणपत्र आणि प्रगत अशा तीन स्तरांवर राबवल्या जाणार्या या अभ्यासक्रमात भारतीय संस्कृती, संगीत, आयुर्वेद, तत्त्वज्ञान, योग, लोककला, भाषा, वैदिक गणित, ज्योतिष, तर्कशास्त्र अशा घटकांवर आधारित असलेल्या अभ्यासक्रमासाठी आचार्य, धार्मिक सत्संगाचा समावेश करण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या पार्श्वभूमीवर लोकांना समृद्ध भारतीय संस्कृती आणि वारशाची ओळख करून देण्यासाठी 'लेट्स नो इंडिया' हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.
भारतीय सभ्यता ही जगात प्राचीन आहे. भारतीयांनी ज्ञानाच्या प्रत्येक क्षेत्रात फार मोठे योगदान दिले असल्याची वस्तुस्थिती आहे. प्राचीन काळात नालंदा, तक्षशीला, विक्रमशीला, वल्लभी अशी विद्यापीठे आंतरराष्ट्रीय केंद्रे होती आणि जगभरातील विद्यार्थी या विद्यापीठांमध्ये ज्ञान संपादनासाठी येत होते. या पार्श्वभूमीवर यूजीसीचे सचिव प्रा. मनीष जोशी यांनी अभ्यासक्रमासंदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध केले.
या अभ्यासक्रमावर 31 मार्चपर्यंत हरकती-सूचना नोंदवता येणार आहेत.
अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी उच्च शिक्षण संस्थांनी पात्रता निश्चित करावी. एकूण साठ तासांच्या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना श्रेयांक दिले जातील. ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने हा अभ्यासक्रम शिकवला जाईल. श्रेयांक हस्तांतरण करता येईल. प्रकल्प, निबंध लेखन, प्रश्नमंजुषा, भाषण आदी माध्यमातून विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केले जाईल. अभ्यासक्रम पूर्ण करणार्या विद्यार्थ्यांना संबंधित उच्च शिक्षण संस्थेकडून डिजिटल प्रमाणपत्र दिले जाईल.