

पुणे : युद्धजन्य स्थिती निर्माण झाल्यामुळे केंद्रशासनाने काही विमानतळांवरील विमानसेवा तात्पुरत्या स्थगित केल्यामुळे शुक्रवारी (दि. 9)सुद्धा पुणे विमानतळावरील सेवेवर परिणाम दिसला. शुक्रवारी (दि. 9) दिवसभरात एकूण नऊ विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली. यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला. रद्द झालेल्या विमानांमध्ये इंडिगो एअरलाईन आणि स्पाइसजेट एअरलाईनच्या विमानांचा समावेश होता, असे विमानतळ प्रशासनाने कळवले.
1) अमृतसर-पुणे (6 ई 6129)
2) चंदीगड-पुणे (6 ई 681)
3) पुणे-चंदीगढ (6 ई 242)
4) पुणे-अमृतसर (6 ई 721)
5) नागपूर-पुणे (6 ई 6659)
6) पुणे-जोधपूर (6 ई 133)
7) जोधपूर-पुणे (6 ई 414)
8) जयपूर-पुणे (एसजी 1077)
9) पुणे-भावनगर (एसजी 1077)
पुणे विमानतळाने दिलेल्या माहितीनुसार, रद्द झालेल्या सर्व प्रवाशांना त्यांच्या संपर्क माध्यमांद्वारे, विमान कंपन्यांच्या माध्यमातून, तसेच विमानतळावरील उद्घोषणा आणि डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. या विमानसेवेतील बदलांमुळे प्रभावित झालेल्या प्रवाशांना नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (डीजीसीए) मार्गदर्शक तत्त्वांनुसार मदत पुरवण्यात आली आहे. संबंधित विमान कंपन्यांनी प्रवाशांना पूर्ण परतावा किंवा पर्यायी विमान व्यवस्थेचे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. विमानतळ कर्मचारी प्रवाशांना आवश्यक सहाय्य पुरवण्यासाठी तत्पर आहेत. अधिक माहिती आणि मदतीसाठी प्रवाशांनी त्यांच्या संबंधित एअरलाईनशी संपर्क साधावा, असे आवाहन पुणे विमानतळाने केले आहे.