

टाकळी भीमा: शिरूर तालुक्यातील धार्मिक आणि बागायत गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या टाकळी भीमा येथील नागरिकांसमोर सध्या स्मशानभूमीच्या दुरवस्थेचा प्रश्न उभा राहिला आहे. गावातील स्मशानभूमीची दयनीय अवस्था झाली असून, येथील परिसराला अत्यंत खराब, बकाल स्वरूप आले आहे. यामध्येच ग्रामस्थांना आपल्या प्रियजनांचे अंत्यसंस्कार, दशक्रिया विधीचे कार्यक्रम करावे लागत आहेत.
स्मशानभूमीत अंत्यविधीची सुविधा असलेल्या चौथऱ्यात प्लास्टिकचे ग्लास, दारूच्या बाटल्या तसेच इतर कचरा साचलेला असून, शेडमधील ग्रिल तुटलेले आहेत, फरशी उखडलेली आहे, पालापाचोळा आणि झाडांच्या फांद्या विखुरलेल्या आहेत. आरसीसी शेड बांधकामासाठी खोदून ठेवलेला पाया अनेक महिन्यांपासून दुर्लक्ष झाल्यामुळे तसाच पडून आहे. ओटा तुटलेला असून, परिसरात मुरमाचे ढीग साचलेले आहेत. परिसरात गवत वाढलेले आहे. (Latest Pune News)
या स्मशानभूमीसाठी जनसुविधा योजनेतून निधी मंजूर झाला. परंतु, तो खर्च करून बांधकाम करण्यासाठी आठ ते नऊ महिन्यांपासून मुहूर्त मिळाला नाही. बांधकाम शेड कोणत्या दिशेला उभारावा यावरून स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये मतभेद असल्याने काम रखडलेले आहे. स्मशानभूमीची अवस्था विद्रूप असून, याबाबत वेळोवेळी पदाधिकाऱ्यांना टोमणे मारताना ग्रामस्थ दिसत आहे.
ग्रामसेविका शीतल थिटे आणि पंचायत समिती बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता रोशन तुमसरे यांनी याबाबत गांधारीसारखी डोळ्यावर पट्टी बांधली आहे. याबाबत विचारले असता ’येरे माझ्या मागल्या अन् ताक कण्या चांगल्या’ असेच चालले आहे.