भोर: भाटघर धरणातील पाण्याला पोपटी रंग आल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील चार-पाच दिवसांपासून धरणातील पाण्याला पोपटी रंग दिसू लागला आहे.
मासेमारी करणार्यांकडून माशांना खाद्य टाकल्यावर त्यातील नायट्रोजनचा थर पाणी शांत झाल्यावर काठावर येत असतो, त्यामुळे पाण्याचा रंग बदलतो. याबाबत जलसंपदा विभागास पत्रव्यवहार केला असल्याचे पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता योगेश भंडवलकर यांनी सांगितले. (Latest Pune News)
धरणाच्या भिंतीच्या उत्तरेकडील बाजूला आणि उत्तरेकडील गावांच्या किनार्यावर पाण्याचा रंग पोपटी दिसत आहे. सकाळी पोपटी रंगाचा तवंग दिसतो आणि दुपारपर्यंत तसाच राहतो. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील संगमनेर, माळवाडी व न-हे गावांच्या लगतच्या जलसाठ्यात हा बदल स्पष्टपणे दिसून येत आहे.
धरणाच्या पाण्यावर भोर शहरासह अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना आहेत. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. भाटघर धरणात मत्स्यसंवर्धन करण्यासाठी काही व्यावसायिकांना परवानगी दिली आहे. हे व्यावसायिक माशांना टाकत असलेल्या खाद्यामुळे पाण्याला पोपटी रंग येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
याबाबत जलसंपदा विभागाचे शाखा अभियंता गणेश ठेंगळे यांनी सांगितले की, माशांना टाकण्यात येत असलेल्या खाद्यांमध्ये नायट्रोजनचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे पाण्यात शेवाळ वाढण्याची प्रक्रिया वेगाने होते. पाणी शांत असल्यावर ते किनार्याला येते. पाण्याच्या लाटा आणि पावसाचे प्रमाण वाढल्यानंतर शेवाळ साठत नाही. त्यामुळे दुपारनंतर धरणातील पाणी नेहमीप्रमाणे स्वच्छ दिसते.
शासनाच्या नियमानुसार भाटघर येथे 15 ते 16 व्यावसायिकांना पिंजरा पद्धतीने मस्त्यसंवर्धन करण्याची परवानगी दिली आहे. माश्यांसाठी टाकलेल्या खाद्यामुळे युट्रोफिकेशन होऊन पाण्याचा रंग पोपटी होतो. पाण्याला पोपटी रंग येण्यासाठी या एका कारणाशिवाय आणखी इतरही कारणे असतात. आम्ही या कारणांचा शोध घेण्याचे काम सुरू केले असून, पाण्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवणार आहे.
- अर्चना शिंदे, सहायक आयुक्त, मत्स्य व्यवसाय, पुणे