

पुणे: नागपूरला जायचंय, मुंबईला जायचंय, दिल्लीला जायचंय, दक्षिण भारतात जायचंय, वर्षातून कधीही रेल्वेने जाण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकावर या. मात्र, येथे बसायला जागाच उपलब्ध होणार नाही, नाइलाजास्तव प्लॅटफॉर्मवरच बॅगा टाकून किंवा अंबेला गेटसमोरील मैदानात बसावे लागते! त्यामुळे कुणीतरी जागे व्हा आणि आम्हाला पुणे रेल्वे स्थानकावर पुरेशी बैठकव्यवस्था उपलब्ध करून द्या, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
दिवसेंदिवस पुणे रेल्वे स्थानकावरून बाहेरील शहरांमध्ये, राज्यांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत आहे. परिणामी, प्रवाशांचा भार पुणे रेल्वे स्थानकावर क्षमतेपेक्षा जास्त वाढला आहे. त्यामुळे आता पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांना वेटिंग करण्यासाठी पुरेशी बैठक व्यवस्था नसल्याचे चित्र दिसू लागले आहे. (Latest Pune News)
प्रवाशांना गाड्यांच्या प्रतीक्षेत जागा मिळेल, तिथे जमिनीवर सामानाच्या बॅगा टाकून बसावे लागत आहे, या समस्येवर वेळीच उपाय करण्याची आवश्यकता निर्माण झाली असून, येथे ही समस्या मोठे आणि भीषण स्वरूप घेण्याची शक्यता आहे.
याबाबत नागपूरकडे रेल्वेने येणारे-जाणारे प्रवासी सुधीर गायकवाड म्हणाले, पुणे रेल्वे स्थानकावरून आम्ही सातत्याने कामानिमित्त नागपूरला जात असतो. दरवेळी येथे प्लॅटफॉर्मवरच बसायला लागते. प्रशासनाने पुणे रेल्वे स्थानकावरील प्रवाशांची संख्या लक्षात घेता, प्रवाशांसाठी कायमस्वरूपी पुरेसी बसण्याची व्यवस्था करून द्यावी. त्याचबरोबर पुणे रेल्वे स्थानकावर असलेली प्रतीक्षालये प्रवाशांना मोफत उपलब्ध करून द्यावीत.
मागच्या वेळी पुणे रेल्वे स्थानकावरील प्रवाशांच्या बैठक व्यवस्थेचा विषय डीआरएमसमोर आम्ही मांडला होता. प्रवाशांना कायमस्वरूपी बसायला चांगली जागा मिळायला हवी. पुणे स्टेशनवर मोफत पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मार्गी लागायला हवा. पिण्याच्या पाण्यासोबतच रेल्वे स्थानकावरील एसी प्रतीक्षालये देखील रेल्वेने प्रवाशांसाठी मोफत उपलब्ध करून द्यावीत, यांसारख्या पायाभूत सुविधा मिळायलाच हव्यात. दोन वर्षांपासून याचा पाठपुरावा आमच्याकडून सुरू आहे, मात्र, अधिकारी याकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीत, याची आम्ही केंद्र सरकारकडे तक्रार करणार आहोत.
- आनंद सप्तर्षी, सदस्य, प्रादेशिक सल्लागार समिती, मध्य रेल्वे
पुणे रेल्वे स्थानकावर बसायला दोन एसी प्रतीक्षालये, दोन स्लीपर प्रतीक्षालये, एक महिलांचे प्रतीक्षालय आणि एक प्रतीक्षा एरिया, असे एकूण सहा ठिकाणी प्रवाशांना गाडी येईपर्यंत पुणे स्टेशनवर बसण्यासाठी जागा उपलब्ध केल्या आहेत. या व्यतिरिक्त नवीन लोखंडी बँचेस देखील बसविण्यात आले आहेत. तसेच, वरिष्ठ पातळीवर पुणे रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाचे नियोजन आहे. पुनर्विकास झाल्यावरसुद्धा मोठी जागा प्रवाशांना बसण्यासाठी उपलब्ध होईल. याव्यतिरिक्त गाडीसाठी वेटिंग करणाऱ्या प्रवाशांना बसायला जास्तीत जास्त जागा उपलब्ध होईल, अशी व्यवस्था केली जात आहे.
- हेमंतकुमार बेहरा, विभागीय वाणिज्य अधिकारी तथा जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, पुणे विभाग