

बापू रसाळे
ओतूर : जुन्नर तालुक्यातील बहुतांश भाग हा बिबट प्रवण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. जुन्नर तालुक्यात बिबट्यांच्या अधिवासासाठी पोषक वातावरण असल्याने व ऊसाचे शेतीक्षेत्र अधिक असल्यामुळे अलीकडच्या काळात बिबट्यांची संख्या लक्षवेधी वाढली आहे. गेल्या काही दिवसात बिबट्याकडून पशुधन व मानवी हल्ल्याच्या घटनांमध्येही मोठी वाढ झाली असून ही बाब दिवसेंदिवस चिंताजनक बनत चालली आहे.
वन खात्याच्या वतीने गावागावात, वाडी-वस्त्यांवर स्पीकरद्वारे सावधानता बाळगण्याचे आवाहन केले जात असून जनजागृती मोहीम राबविली जात आहे. ओतूर, खामुंडी, डुंबरवाडी, पानसरेवाडी, डिंगोरे, उदापूर, शेटेवाडी, अहीनवेवाडी, पानसरेवाडी, घुले पट, रोहकडी वगैरे आदी परिसरातील वस्त्यांवर दिवसभरात कोणत्याही वेळात बिबट्याचे दर्शन सुलभ झाले आहे. उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दैनंदिन बिबट्याच्या करामतीचे वाढते प्रमाण पाहता बिबट्यांची दहशत आपसूकच पसरते आहे. त्यातच बिबट हल्ल्याचे सत्र थांबेना अशी काहीशी परिस्थिति निर्माण झाल्यामुळे ग्रामीण भागात शेतकरी व नागरिक भयभीत जीवन जगत आहेत. 8पान 2 वर
अनेक बाबींबाबत वन विभागाकडून जनजागृती
रात्रीच्या वेळात लहान मुलांना घराचे अंगणात एकट्याने सोडू नये, घराचे परिसरातील विजेचे दिवे सुरू ठेवावेत, घराचे अंगणात शेकोटी पेटती ठेवावी, पशुधनावर हल्ला होऊ नये म्हणून गोठा पूर्णपणे बंदिस्त असावा, गुरे चरायला नेताना गुराख्यानी जमावाने जावे, घुंगराची काठी जवळ बाळगावी, बिबट्या समोर आल्यास आरडाओरड करावी, बिबट्याचा पाठलाग करू नये कारण तो उलट हल्ला करू शकतो, बिबट्याबाबत चुकीच्या अफवा पसरवू नयेत, या प्रकारचे आवाहन वन विभागाकडून करण्यात येत आहे.
सातच्या आत घरात
गावात, मंदिरात, सोसायटीत, शेतात, कोंबड्यांच्या पोल्ट्रीत, गुरांचे गोठ्यात बिबटे खुलेआम वावरताना निदर्शनास येत आहेत. परिणामी नागरिक बहुतांश गावे व वाडी-वस्त्यावर सायंकाळी सातचे आत घरात जाणे पसंत करीत आहेत. इतकेच नाही तर छोट्या वस्त्यावरील घरे सायंकाळी बंद होत असल्याने अघोषित गाव बंदचा प्रत्यय येऊ लागला आहे.