बावडा: इंदापूर तालुक्यात सुरू असलेल्या विक्रमी अवकाळी पावसामुळे खरीप हंगामासाठी शेतकर्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी, बी-बियाणे, खते, कीटकनाशके आणि कृषी निविष्ठांची खरेदी करण्यासाठी तालुक्यातील कृषी सेवा केंद्रांमध्ये शेतकर्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे.
खरीप हंगामासाठी बाजरी, तूर, उडीद, सोयाबीन, सूर्यफूल, मका व कांदा आदी पिकांच्या पेरणीसाठी शेतकरी मागील तीन आठवड्यांपासून कृषी केंद्रांत जात आहेत, अशी माहिती बावडा येथील घोगरे पाटील अॅग्रो एजन्सीचे महावीर घोगरे यांनी दिली. ते म्हणाले, उगवलेल्या पिकांवर फवारणीसाठी कीटकनाशके व बुरशीनाशकांची मागणीही मोठ्या प्रमाणावर वाढली असून, केंद्रांमध्ये आवश्यक औषधांचा व बियाण्यांचा पुरेसा साठा आहे. (Latest Pune News)
मका व कांद्याला प्राधान्य
चालू हंगामात मका व कांद्याचे उत्पादन घेण्याकडे शेतकर्यांचा कल वाढला आहे. बाजारात मक्याचे एकरी 40 ते 50 क्विंटल उत्पादन देणारे दर्जेदार बियाणे उपलब्ध झाले असल्याने शेतकरी त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करत असल्याचे घोगरे यांनी सांगितले.