धायरी, नर्‍हे परिसरातील रस्त्यांवर वाढले धुळीचे प्रदूषण : आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

धायरी, नर्‍हे परिसरातील रस्त्यांवर वाढले धुळीचे प्रदूषण : आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : धायरी, नर्‍हे परिसरातील रस्त्यांसह मुख्य सिंहगड रस्त्यावर धुळीचे प्रदूषण वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य ऐरणीवर आले आहे. या समस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. धुळीच्या वाढत्या प्रदूषणामुळे श्वसनाचे विकार वाढले आहेत. रस्त्यालगतच्या रहिवाशांना घराचे दरवाजे, खिडक्या बंद कराव्या लागत आहेत. पावसाळा संपताच या परिसरातील रस्त्यांवर धुळीचे लोट पसरत आहेत. सर्वात गंभीर स्थिती धायरी येथील रायकर मळा व धायरी-नर्‍हे रस्त्याची आहे.

या भागात लहान, मोठ्या सोसायट्या लोकवस्त्यांचे जाळे पसरले आहे. गल्लीबोळात प्री-प्रायमरी शाळांसह शैक्षणिक संस्थाही वाढल्या आहेत. त्यामुळे पदचारी विद्यार्थी, नागरिकांची संख्या वाढली आहे. महामार्गाकडे जाण्यासाठी जवळचे अंतर असल्याने खाजगी प्रवासी बससह इतर वाहनांची या रस्त्यावर वर्दळ असते. रस्त्यावर टँकरने पाणीही मारले जात आहे. मात्र, तासाभरात पाणी सुकून रस्त्यावर पुन्हा धुळीचे लोट पसरत आहेत. त्यामुळे पदचार्‍यांसह दुचाकी वाहनचालक, प्रवाशांसह स्थानिक रहिवासी, भाजीपाला विक्रेते, दुकानदारांना गैरसोयीला तोंड द्यावे लागत आहे. आम आदमी पक्षाचे शहर प्रवक्ते धनंजय बेनकर यांनी या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

वाहतूक विभागाने दखल घ्यावी

याबाबत सिंहगड रस्ता पथ विभागाचे उपविभागीय अभियंता नरेश रायकर म्हणाले की, रस्त्यावर धुळीचे लोट पसरत आहेत, याची दखल वाहतूक विभागाने घेणे गरजेचे आहे. वाहतूक विभागाने मात्र याकडे दुर्लक्ष केले असल्याचे चित्र पुढे आले आहे. धुळीच्या वाढत्या प्रदूषणामुळे या परिसरातील लाखो नागरिक त्रस्त झाले आहेत.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news