

मंचर: यंदा उन्हाची तीव्रता जास्त असल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन होऊन उपलब्ध पाण्याचे साठे कमी होत चालले आहेत. डिंभे धरणात केवळ 13 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. शेती सिंचन आणि पिण्यासाठी या पाण्याचा कसा पुरवठा करायचा, हा प्रश्न सर्वांनाच भेडसावत आहे.
अशाही स्थितीत पाटबंधारेमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना मीना आणि घोड शाखेला पाणी सोडण्यात यावे, अशी विनंती करणारे पत्र दिले आहे. लवकरच कालव्याला पाणी सुटेल, अशी माहिती माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी रविवारी (दि. 4) दिली. (latest pune news)
शरद सहकारी बँकेच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत दिलीप वळसे पाटील बोलत होते. या वेळी भीमाशंकर साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे पाटील, शरद बँकेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, कारखान्याचे संचालक दादाभाऊशेठ पोखरकर, राजेंद्र गावडे, बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश घोलप आदी उपस्थित होते.
दिलीप वळसे पाटील म्हणाले की, सध्या कुकडी प्रकल्पातील पाण्याची आकडेवाडी पाहता शेती सिंचनासाठी आणि पिण्यासाठी एक आवर्तन सुटू शकते. सोमवारी (दि. 5) अहिल्यानगर येथे मंत्री विखे पाटील यांनी कालवा सल्लागार समितीची बैठक बोलावली आहे.
या बैठकीला उपस्थित राहणार आहे. उपलब्ध पाणी जपून वापरले तर शेतकर्याना सिंचनाची अडचण येणार नाही. यंदा शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी पाण्याचे टँकर सुरू झाले आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचे नियोजनदेखील चालू आहे.
पिके वाचली पाहिजेत
कुकडीचे पाणी शेतकर्यांना मिळावे, अशी भूमिका नेहमीच राहिली आहे. भविष्यात पाणीप्रश्न गंभीर होईल, अशी भीती व्यक्त करून ते म्हणाले, शेतकर्यांना आगामी काळात पाणी कमी पडू न देण्याचा प्रयत्न आहे. पिके वाचली पाहिजेत, ही भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. कळंब येथील आंदोलनाबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर दिलीप वळसे पाटील यांनी, काही तरी कृत्य करून फोकसमध्ये राहाणे आवडत नाही.