Onion Price in Alephata Market
आळेफाटा: जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती आळेफाटा उपबाजारात शुक्रवारी (दि. 13) झालेल्या कांदा लिलावामध्ये भावात वाढ झाली. चांगल्या प्रतीच्या गोळा कांद्यास प्रति 10 किलोस 221 रुपये कमाल भाव मिळाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती संजय काळे आणि उपसभापती प्रीतम काळे यांनी दिली.
पूर्वमोसमी वळवाच्या जोरदार पावसाने शेतातील कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यातच पुन्हा पावसाचे आगमन झाल्याने शेतकरी कांदा विक्रीस आणत असल्यामुळे आळेफाटा उपबाजारातील कांदा आवक वाढली आहे. (Latest Pune News)
गेल्या महिनाभरापासून आळेफाटा उपबाजारात कांदा भावात हळूहळू वाढ होत असल्याचे लिलावात दिसून येते. मात्र, मिळणारे भाव हे सरासरी कमीच असल्याने शेतकरी हवालदिल आहेत. रविवारी (दि. 8) झालेल्या लिलावात कांदा भावाने प्रति 10 किलोस 200 रुपयांचा टप्पा पार केला होता. शुक्रवारी पुन्हा भावात वाढ झाली.
आळेफाटा उपबाजारातील कांद्यास आता परराज्यांतून मागणी होत असल्याने भावात वाढ होत आहे. शुक्रवारी झालेल्या लिलावात शेतकरीवर्गाने 16 हजार 692 गोणी कांदा विक्रीसाठी दाखल झाला होता, अशी माहिती सचिव रूपेश कवडे आणि कार्यालयप्रमुख दीपक मस्करे यांनी दिली.
कांदा भाव प्रतिदहा किलोस
एक्स्ट्रा गोळा : 200 ते 221
सुपर गोळा : 180 ते 200
सुपर मीडियम : 160 ते 180
गोल्टी/गोल्टा : 140 ते 160
बदला/चिंगळी : 30 ते 110