आळेफाटा: जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा उपबाजारात मंगळवारी (दि. 24) झालेल्या कांदा लिलावात भावात काही प्रमाणात वाढ झाली. गोळा कांद्यास प्रति 10 किलोस 225 रुपये भाव मिळाल्याची माहिती सभापती संजय काळे आणि उपसभापती प्रीतम काळे यांनी दिली.
आळेफाटा उपबाजारात या महिन्यातील लिलावात कांदा भावात हळूहळू वाढ होत जाऊन मध्यानंतर बाजारभावाने प्रति 10 किलोस 200 रुपयांचा टप्पा पार केला; मात्र सध्या मिळणारा भाव हा सरासरी कमी असल्याने शेतकरीवर्ग हवालदिल आहेत. पावसामुळे कांदा खराब होणार असल्याने शेतकरी कांदा बाजारात विक्रीस आणत आहेत. (Latest Pune News)
आळेफाटा उपबाजारात देखील यामुळे सध्या कांद्याची आवक चांगली होत आहे. जुन्नर तालुक्यासह शिरूर तसेच शेजारील अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर, पारनेर व अकोले तालुक्यातील शेतकरीवर्ग येथे कांदा विक्रीस आणत आहे.
मंगळवारी झालेल्या कांदा लिलावात शेतकरी वर्गाने 13 हजार 234 गोणी कांदा विक्रीस आणला असल्याची माहिती संचालक नबाजी घाडगे, सचिव रूपेश कवडे, कार्यालयप्रमुख दीपक मस्करे यांनी दिली. आळेफाटा उपबाजारातील कांद्यास दक्षिणेकडील राज्यांमधून चांगली मागणी होत असल्याचे संजय कुऱ्हाडे, विजय कुऱ्हाडे, अनिल गडगे, जीवन शिंदे, शिवप्रसाद गोळवा व ज्ञानेश्वर गाढवे या अडतदार व्यापाऱ्यांनी सांगितले.
प्रति 10 किलोस मिळालेले भाव
एक्स्ट्रा गोळा : 210 ते 225
सुपर गोळा : 190 ते 210
सुपर मीडियम : 170 ते 190
गोल्टी/गोल्टा : 150 ते 170
बदला/चींगळी : 40 ते 110