येरवडा: येरवडा येथील अमरधाम हिंदू स्मशानभूमीत मंगळवारी वीजपुरवठा खंडित झाल्याने महिलेच्या अंत्यविधीसाठी तीन तास वाट पाहावी लागली. वीज गेल्यानंतर जनरेटरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा प्रकार घडल्याचे स्मशानभूमीतील कर्मचार्यांनी सांगितले.
अमरधाम हिंदू स्मशानभूमीत दोन विद्युत दाहिन्या आहेत. यातील एका विद्युत दाहिनीला जनरेटर बसविण्यात आला आहे, तर दुसरी वाहिनी विजेवर चालते. मंगळवारी सकाळी पाऊणेअकराच्या सुमारास येरवडा परिसरातील एका महिलेचा मृतदेह नातेवाईकांनी अंत्यसंस्कार करण्यासाठी या ठिकाणी आणला. (Latest Pune News)
मात्र, त्यावेळी स्मशानभूमीतील वीजपुरवठा खंडित झाला. त्यानंतर कर्मचार्यांनी जनरेटर सुरू करण्याचा प्रयत्न केला, परंतु जनरेटर सुरू झाले नाही. त्यामुळे महिलेच्या नातेवाईकांना पुन्हा वीजपुरवठा सुरळीत होण्याची वाट पाहवी लागली. अखेर तीन तासांनंतर वीजपुरवठा सुरळी झाल्यानंतर या महिलेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
याबद्दल मृत महिलेच्या नातेवाईकांसह नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. ठेकेदाराकडून जनरेटरच्या देखभाल आणि दुरुस्तीचे काम व्यवस्थित होत नसल्याने हा प्रकार घडला. यामुळे महापालिका प्रशासनाने संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी; अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसचे येरवडा ब्लॉक अध्यक्ष रमेश सकट यांनी दिला आहे.
स्मशानभूमीतील कर्मचारी धीरज गोगावले म्हणाले की, विद्युत दाहिनीचे जनरेटर सुरू आहे, परंतु तांत्रिक बिघाडामुळे ते सुरू झाले नाही. यामुळे अंत्यविधीला उशीर झाला. याबाबत संबंधित अधिकारी आणि ठेकेदाराला माहिती देण्यात आली आहे.