

कडूस : पुढारी वृत्तसेवा : कडूस (ता. खेड) येथे दिवसेंदिवस डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली असून, डेंग्यूचे संशयित रुग्ण वाढू लागले आहेत. अनेकजण तापाने फणफणले असून, ते कडूस, राजगुरुनगर, चाकणसह परिसरातील खासगी रुग्णालयात दाखल झाले आहेत. यामुळे कडूस ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
कडूस गावात डेंग्यूचे रुग्ण आढळत असताना ग्रामपंचायत प्रशासन, प्राथमिक आरोग्य विभाग मात्र सुस्त बसले आहे. एकीकडे खासगी रुग्णालयात डेंग्यूचे रुग्ण मोठ्या संख्येने दाखल होत असताना सरकारी रुग्णालयात मात्र डेंग्यूचे रुग्ण नाहीत. कडूस प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचार्यांची संख्या कमी असताना काही कर्मचारी सध्या चांडोली आरोग्य केंद्रात कार्यरत आहेत. गावात सरकारी दवाखाना असून, वेळेवर उपचार मिळत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. यामुळे सरकारी दवाखान्यात नागरिक जात नसून खासगी दवाखान्यात दाखल होत आहेत. कडूस गावठाणात रुग्णांची संख्या अधिक असल्याचे पाहायला मिळत आहे. डेंग्यूची लक्षणे लहान व तरुण मुलांमध्येही आढळून येत आहेत. ताप येणे, अंग दुखणे, थकवा येणे, सुस्ती वाटणे आणि उलट्या, जुलाब होणे असा त्रास होत आहे.
गावात धुराची फवारणी, औषध फवारणी करणार असून, ग्रामपंचायत पातळीवर सर्व उपाययोजना राबवणार आहे. डेंग्यूचे मच्छर हे अधिक काळ साचलेल्या पाण्यात तसेच छोट्या-छोट्या डबक्यात निर्माण होतात. हे मच्छर चावतात. या मच्छरांपासून बचाव करायचा असेल, तर फक्त प्रशासनावर अवलंबून न राहता नागरिकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. त्यासाठी घराजवळचे गवत कापणे, स्वच्छता पाळणे, घरातील भांड्यात किंवा बाहेर पाणी साचणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे.
– शहनाज तुरूक, सरपंच, कडूस.