

मंचर : पुढारी वृत्तसेवा : श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान येथे वाहनतळ ते भीमाशंकर बस स्थानक यादरम्यान भाविकांची वाहतूक करण्यासाठी असणार्या एसटी बसची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळे मंगळवारी (दि. 1) प्रवाशी व भाविकांची मोठी गैरसोय झाली. राजगुरुनगर आगाराने श्रावण महिना संपेपर्यंत किमान 20 बस सुरू ठेवाव्यात, अशी मागणी भाविकांनी केली आहे. अधिक मास महिना तसेच पुढील काही दिवसांत श्रावण महिना सुरू होणार असल्याने बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे देशभरातील भाविक दर्शनासाठी गर्दी करत आहेत. तसेच भीमाशंकर येथे अभयारण्य असल्याने निसर्गरम्य परिसर पाहण्यासाठी अनेक पर्यटकदेखील येत आहे; मात्र भाविक व पर्यटकांना येथे आल्यानंतर महामंडळातर्फे बसगाड्यांची वेळेत व पुरेशी सोय नसल्याने अनेक भाविकांची गैरसोय होत आहे.
भीमाशंकर येथे येणारे भाविक व पर्यटकांसाठी भीमाशंकर मुख्य देवस्थानापासून अलीकडे चार किलोमीटर अंतरावर वाहनतळ तयार करण्यात आले आहेत. दर्शनासाठी येणारे भाविक त्या ठिकाणी आपली वाहने पार्क करून वाहन तळावरून एसटी महामंडळाच्या बसने बस स्थानकापर्यंत जातात. पुन्हा माघारी येण्यासाठी एसटी बसचा उपयोग केला जातो. मात्र, सध्या महामंडळाकडून अपुर्या बस असल्याने व भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने वेळेत बस न मिळाल्याने अनेक भाविकांना तासन् तास एसटी बसची वाट पाहवी लागत आहे. सुट्टीच्या दिवशी तर बसमध्ये जागा मिळवण्यासाठी एकच झुंबड उडत आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिक, लहान मुले यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच भीमाशंकर येथून माघारी येण्यासाठी बस पूर्ण भरेपर्यंत थांबावे लागत असल्याने अनेक भाविकांना तासन् तास उभे राहून राहावे लागत असल्याने यामध्ये वेळ जात आहे.
प्रशासनाचे नियोजन कोलमडले
खरंतर दरवर्षी श्रावण महिन्यात श्री क्षेत्र भीमाशंकर येथे येणार्या भाविकांसाठी प्रशासनाच्या वतीने काय काय उपाययोजना केल्या जातील, याबाबत नियोजन केले जाते. मात्र, या वर्षी अपुर्या बस असल्याने प्रशासनाचे नियोजन कोलमडले आहे. भाविक व पर्यटकांना वाहनतळापासून भीमाशंकर येथे सोडण्याची व बस पुरवण्याची जबाबदारी राजगुरुनगर बस आगाराची आहे. भाविकांना घेऊन जाण्यासाठी कमीत कमी 16 बसगाड्यांची गरज आहे. मात्र, सद्य:स्थितीत त्या ठिकाणी आठ बसगाड्या सुरू आहेत. त्यामुळे राजगुरुनगर आगाराने श्रावण महिना संपेपर्यंत बसगाड्यांची संख्या किमान 20 ठेवावी, अशी मागणी भीमाशंकर साखर कारखान्याचे तज्ज्ञ संचालक गणेश कोकणे आणि शरद बँक मंचरचे संचालक प्रदीप आमोडकर यांनी केली आहे.