नर्‍हे परिसरात लोकसंख्येच्या तुलनेत अपुरा पाणीपुरवठा; टंचाईची समस्या गंभीर

नर्‍हे परिसरात लोकसंख्येच्या तुलनेत अपुरा पाणीपुरवठा; टंचाईची समस्या गंभीर

धायरी : पुढारी वृत्तसेवा : नर्‍हे येथे वर्षभर पाणीटंचाई जाणवत असून, सध्या ही समस्या गंभीर झाली आहे. पाण्यासाठी नागरिकांना वणवण फिरावे लागत आहे. श्री कंट्रोल चौक, झिल कॉलेज परिसर, इंगळे वस्ती, अभिनव कॉलेज, जेएसपीएम कॉलेज, महाराष्ट्र बँक परिसर, गोकूळनगर, मानाजीनगर या भागांत सध्या तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे.

परिसरात महापालिकेच्या वतीने दिवसाआड अर्धा ते पाऊण तास कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. मात्र, या भागासाठी महापालिकेकडून अद्याप एकही टँकर उपलब्ध करून देण्यात आला नाही. ग्रामपंचायत काळापासून जेवढा पाणीपुरवठा करण्यात येत होता, तेवढाच पाणीपुरवठा या गावाचा महापालिकेत समावेश झाल्यानंतरही महापालिकेकडून करण्यात येत आहे. लोकसंख्येच्या तुलनेत हा पाणीपुरवठा अपुरा असल्याचे नागरिकांनी सांगितले.

पुरेसे पाणी मिळत नसल्याने सध्या नागरिक हैराण झाले आहेत. अनेक सोसायट्यांना पिण्याच्या व वापरण्याच्या पाण्यासाठी खासगी टँकरवरच अवलंबून राहावे लागत आहे. सोसायट्यांमध्ये अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. नर्‍हे गावाचा महापालिकेत समावेश होऊनही पाणीटंचाईवर महापालिकेने अद्यापपर्यंत कायमस्वरूपी उपाययोजना केली नसल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

नर्‍हे येथे ग्रामपंचायत काळात व्यवस्थित पाणीपुरवठा करण्यात येत होता, परंतु या गावाचा महापालिकेत समावेश झाल्यापासून नागरिकांना वर्षभर पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

-सागर भूमकर, माजी उपसरपंच, नर्‍हे

नर्‍हे ग्रामपंचायत काळात
जेवढा पाणीपुरवठा करण्यात
येत होता, तेवढाच पाणीपुरवठा आता महापालिकेकडून करण्यात येत आहे. या भागात अजून नवीन नळजोड दिले नाहीत.

– दीपक रोमन, अभियंता, पाणीपुरवठा विभाग, महापालिका

कमी दाबाने पाणीपुरवठा

नर्‍हे ग्रामपंचायत निधीतून 1 कोटी 22 लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या वीस लाख लिटर पाण्याच्या टाकीतून परिसरात सध्या दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. मात्र, पाण्याचा दाब कमी असतो, तसेच फक्त अर्धा ते पाऊण तास पाणी येत असल्याने नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. यामुळे नागरिकांकडून खासगी टँकरला मागणी वाढली आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news