पुणे; पुढारी वृत्तसेवा : दरवर्षी साजरा होणारा 'ख्रिसमस संध्या' यंदा बालगोपाळांबरोबरच त्यांच्या पालकांसाठीही आनंदाची पर्वणी ठरली. समानतेचा संदेश देताना तिरंगी फुगे आकाशात सोडून 'ख्रिसमस संध्या' उत्साहात साजरा करण्यात आला. माजी उपमहापौर आबा बागुल यांनी कै. वसंतराव बागुल उद्यान येथे सर्वधर्मीयांसमवेत ख्रिसमस संध्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
जयश्री बागुल, माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, माजी मंत्री रमेश बागवे, माजी नगरसेवक चंदू कदम, रफिक शेख, हेमंत बागुल आदींसह मान्यवर उपस्थित होते. या वेळी बागुल म्हणाले, आज देशात सर्वधर्मसमभाव जो आहे तो केवळ काँग्रेस पक्षामुळेच आहे आणि काँग्रेस पक्षाची ही शिकवणूक आहे. त्यामुळे गेली 22 वर्षे हा उपक्रम साजरा केला जातो. ख्रिसमस संध्यानिमित्त या वेळी उपस्थित बालचमूंना रोज आई-वडिलांची सेवा आणि देशाचे रक्षण करण्याची शपथ देण्यात आली. सूत्रसंचालन अमित बागुल यांनी केले.