पुणेकरांवर 17 वर्षांपासून थंडी रुसलेलीच ! 2006 नंतर किमान तापमान 9 ते 10 अंशांखाली गेले नाही

पुणेकरांवर 17 वर्षांपासून थंडी रुसलेलीच  ! 2006 नंतर किमान तापमान 9 ते 10 अंशांखाली गेले नाही

पुणे : गेल्या तीस वर्षांत शहराचा सर्वच बाजूंनी विस्तार झाला. मात्र, त्यामुळे शहराचे नैसर्गिक हवामान पुरते बिघडून गेले. परिणामी, यंदा पुणेकरांना गुलाबी थंडीच अनुभवता आली नाही. अगदी अलिकडे म्हणजे 27 जानेवारी 2006 रोजी शहरात 4.7 अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद झाली. त्यानंतर मात्र शहर 9 ते 10 अंशांखाली गारठलेच नाही.

मी शहराबाहेर कुठेही गेलो तरी 24 तासांत पुणे गाठतोच. कारण, मला पुण्याची हवा खूप आवडते. या शहराची हवा आल्हादायक अन् हवीहवीशी वाटते, हे उदगार आहेत भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे. अशी पुण्याच्या हवामानाची महती पंडितजींनी एका मुलाखतीत सांगितली आहे. त्याची व्हिडीओ क्लिप यू-ट्यूबवर आहे. अशी आल्हाददायक हवा आणि हिवाळ्यातील गुलाबी थंडी सुमारे तीस वर्षांपूर्वी गायब होण्यास सुरुवात झाली. यंदाच्या हिवाळ्यात शहराचे तापमान फार कमी वेळा जेमतेम 10 अंशांवर गेले. तेही एनडीए या खडकवासला धरणाजवळच्या भागाचे. बाकी शहरात मात्र तापमान 12 ते 17 अंशांवर आहे. त्यामुळे 1.7 ते 4 अंशाखाली जाणारे पुणे गेल्या तीस वर्षांत फार कमीवेळा अनुभवायला मिळालेले दिसते.

तीन दशकांत नेमका काय बदल झाला?
गेल्या तीन दशकांत पुण्याचे हवामान बदलले आहे. विशेषत: औद्योगिक पट्ट्यांचा झपाट्याने विस्तार झाल्यापासून पुण्यात उष्ण, अर्ध-रखरखीत हवामान सरासरी तापमान 19 ते 33 अंशावर गेले. झपाट्याने वाढणार्‍या लोकसंख्येमुळे शहराचा विस्तार झाला. 43 खेडी शहरात आली. सिमेंटचे रस्ते, वृक्षांची कत्तल, वाढती वाहनसंख्या, यामुळे प्रदूषण झपाट्याने वाढले. 1993-93 ते 2024 पर्यंतच्या प्रवासात शहराची हवा खूप प्रदूषित झाली, असा दावा महापालिकेनेच आपल्या पर्यावरण अहवालात केला आहे.

पुणे लवकर थंड होते; परंतु…
शहरात दिवसा किती कडक उन्हं असले तरी मराठवाडा व विदर्भातील शहरांप्रमाणे शहर रात्री उष्ण नव्हते. ते सायंकाळी गार होत असे. मात्र, गेल्या काही वर्षांत पुण्यातील रात्रीचे तापमान वाढले आहे. गेल्या तीस वर्षांपासून या बदलास सुरुवात झाली. गेल्या पाच वर्षांत तर शहराचे तापमान विचित्र झाले. मे महिन्यापर्यंत उन्हाळा संपत नसला तरी, शहरात अनेकदा मे महिन्यात जोरदार धुळीचे वारे येतात. त्यामुळे उष्ण महिन्यांतही शहर लवकर थंड होते, असा शहराच्या तापमानाचा जुना आलेख सांगतो. 30 एप्रिल 1897 रोजी आतापर्यंतचे सर्वोच्च तापमान 43.3 नोंदविले गेले होते. त्या दिवशी शहर सायंकाळी सात वाजता थंड झाले होते.

शहर गारठले

गेल्या दोनच दिवसांत शहरातील किमान तापमानात झपाट्याने घट झाली असून मंगळवारी शहराचा पारा 9.9 ते 11.4 अंशांवर खाली आला. एनडीए (9.9), शिवाजीनगर (11.4) तर पाषाण (12.4) अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवले गेले. तीन दिवसांपूर्वी शहराचे किमान तापमान 12.8 ते 18 अंशांवर होते. मात्र सोमवारपासून पारा घसरण्यास सुरुवात झाली. सोमवारी एनडीए 10.5 तर शिवाजीनगरचा पारा 12.5 अंशांवर खाली आला. तर मंगळवारी एनडीए परिसराचे तापमान 9.9 व शिवाजीनगरचे 11.4 अंशांवर आले होते. आगामी चारही दिवस शहरात असेच वातावरण राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

हिवाळ्यातील रात्रीचे तापमान वाढले
शहरात पूर्वी नोव्हेंबरमध्येच रोझी कोल्ड (गुलाबी थंडी) अशी थंडी पडत असे. दिवाळीत हमखास थंडी पडत असे. मात्र, गेल्या दहा वर्षांपासून दिवाळीतील थंडी पुणेकरांना अनुभवायला मिळालेली नाही. डिसेंबर व जानेवारीमध्ये रात्रीचे तापमान 9 अंशांखालीच असते. अनेकवेळा ते 5 ते 6 अंशांवर असते. 17 जानेवारी 1935 रोजी शहरात सर्वांत कमी तापमान 1.7 अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news