

नवी सांगवी : पिंपळे गुरव येथील काटेपुरम चौक येथून मयूर नगरीच्या दिशेने जात असताना तीनचाकी टेम्पो उलटता उलटता वाचला. थोडक्यात अनर्थ टळला. यावेळी क्षमतेपेक्षा जास्त ओझे घेऊन तसेच स्वतःचा जीव व इतरांचाही जीव धोक्यात घालून वाहन चालविणे कितपत योग्य आहे.
शनिवारी भर दुपारी एकच्या सुमारास येथील मुख्य रस्त्यावरून भरधाव वेगाने जात असताना अचानक चढ लागल्याने क्षमतेपेक्षा जास्त ओझे असलेला टेम्पो एका क्षणात उलटला. नशीब बलवत्तर होते म्हणून थोडक्यात निभावले. यावेळी टेम्पोवर लांब वजनदार पत्रे, अल्युमिनियमचे अँगल धोकादायकरित्या वाहनचालक घेऊन जात होता. वाहतूक पोलिस अशा धोकादायक पद्धतीने वाहन चालविणार्यांवर कारवाई का करीत नाहीत, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.