अनिल तावरे
सांगवी: बारामती तालुक्याच्या ग्रामीण भागात निरा डावा कालव्याचे आवर्तन सुरू आहे. परंतु, या कालव्याच्या पाण्याची चोरी मोठ्या प्रमाणावर होत आहे. या धनदांडग्या पाणीचोरांच्या पिकांना चांगलेच बाळसे आले असतानाच खर्या लाभधारक शेतकर्यांच्या पिकांचे मात्र अक्षरशः कोळसे होताना पाहायला मिळत आहे.
गरजेच्या ठिकाणी आवर्तनाची मागणी होत असताना जलसंपदा विभागाकडून पाण्याच्या चोरीमुळेच आवर्तन लांबणीवर पडत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पाणीचोरी रोखण्यासाठी सरकारनेच ठोस उपाययोजना करण्याची मागणी सर्वच स्तरांतून होते आहे. (Latest Pune News)
बारामती व इंदापूर तालुक्यातील गावांतील शेतीसाठी निरा डाव्या कालव्याचे दुसरे उन्हाळी आवर्तन सुरू आहे. हे आवर्तन पाणीचोरीमुळे पुढे सरकता सरकेना झाले आहे. कालवा व वितरिकेच्या लगतच्या बहुतांश धनदांडग्या शेतकर्यांनी पाण्याच्या चोरीचा सपाटा लावला आहे.
जेव्हा कालवा सल्लागार समितीची बैठक झाली होती, तेव्हा या कालव्याच्या पाण्याचे योग्य नियोजन केले जाते. मात्र, प्रत्यक्षात उन्हाळ्यात आवर्तने सोडली जातात, त्याचवेळी पाण्याची चोरी मोठ्या प्रमाणात होते.
त्यामुळे खरे नियमितपणे पाणीपट्टी भरणारे लाभधारक शेतकरी हक्काच्या पाण्यापासून वंचित राहत आहेत. परिणामी, लाभधारक शेतकर्यांच्या शेतातील उभी पिके पाण्याअभावी जळून जाताना दिसत आहेत. ही पाणीचोरी रोखताना जलसंपदा खात्याची मोठ्या प्रमाणावर दमछाक होते आहे.
या कालव्यारील अनेक वितरिकांना मागील पहिले आवर्तन सुटून 55 ते 60 दिवस उलटले आहेत. या वितरिकांचे आवर्तन लांबणीवर गेल्यामुळे शेतातील पिके पाण्याअभावी जळून जाताना दिसत आहेत.
शेतकर्यांनी एकरी 50 हजार ते एक लाख रुपये खर्च करून जगविण्यात आलेली उभी पिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शेतकर्यांना कोट्यवधी रुपयांचे नुकसान सोसण्याशिवाय पर्यायच उरला नाही.
कालवा व वितरिकेतून मोठ्या प्रमाणावर पाण्याची चोरी होत असल्याने आम्हाला योग्य त्या प्रमाणात आवश्यक दाबाने पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे आवर्तन लांबणीवर पडत आहे. वितरिका क्र. 18 ला 10 तारखेच्या आसपास शेतीसाठी आवर्तन सोडण्यात येणार आहे.
- ए. टी. नारायणकर, उपविभागीय अभियंता, जलसंपदा विभाग, पणदरे