

Devendra Fadanvis on local self-government bodies
नगर : विधानसभेच्या निवडणुकीत मेरिटमध्ये पास झालो आहोत. आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील मेरिटमध्ये पास होण्यासाठी, भाजप कार्यकर्त्यांना तयारीला लागायचे आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांवर महायुतीचा झेंडा उभारण्यासाठी पूर्ण शक्तीने कामाला लागा असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांना केले आहे. भाजपचे नवीन कार्यालय भविष्यातील विजयाची नांदी ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
भारतीय जनता पार्टीच्या अहिल्यानगर जिल्हा कार्यालयाचे भूमिपूजन मंगळवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी फडणवीस बोलत होते. यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात आयोजित कार्यक्रमात भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, सभापती प्रा. राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार मोनिका राजळे, आमदार विक्रमसिंह पाचपुते, माजी आमदार बबनराव पाचपुते, वैभव पिचड, भाजपचे लक्ष्मण सावजी, शहर जिल्हाध्यक्ष अॅड. अभय आगरकर, जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, नितीन दिनकर, जिल्हाभरातील नवीन मंडलाध्यक्ष आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अहिल्यादेवींच्या सन्मानासाठीच राज्य मंत्रिमंडळाची बैठक चौंडी येथे घेतली असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
भाजप कार्यालय इमारतीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम हा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीइतकाच महत्त्वाचा आहे. या कार्यालयाच्या माध्यामातून पक्षाच्या विस्ताराला बळ मिळेल आणि कार्यकर्त्यांना आपल्या व्यथा मांडण्यासाठी व्यासपीठ मिळाले आहे.
या निवडणुका म्हणजे भाजपची नवीन परीक्षा असणार आहे. दीड कोटी सदस्यसंख्या असलेला भारतीय जनता पक्ष हा राज्यातील एकमेव पक्ष आहे. अहिल्यादेवी होळकरांसारखा उत्तम प्रशासकीय कारभार करण्यासाठी आतापासूनच कामाला लागा, भाजपच्या नेतृत्वाखाली राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर महायुतीची सत्ता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले की, 2024 हे नेत्यांचे वर्ष होते. आता 2025 हे कार्यकर्त्यांच्या निवडणुकीचे वर्ष असणार आहे. त्यासाठी आतापासूनच निवडणुकीची तयारी करा.
पालकमंत्री विखे पाटील म्हणाले की, भाजपची संघटन ताकत दिवसेंदिवस वाढत असून, याचा प्रत्यय विधानसभा निवडणुकीत आला आहे. महायुतीला मिळालेले यश हे कार्यकर्त्यांचेच श्रेय आहे. त्यासाठी भाजपचे कार्यालय व्हावे यासाठी लक्ष्मण सावजी यांनी वारंवार पाठपुरावा केला आहे. हे कार्यालय विकासाचे केंद्र ठरेल असा विश्वास विखे पाटील यांनी व्यक्त केला. माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी आभार मानले.