राजेंद्र कवडे देशमुख
बावडा(पुणे) : हेल्मेट हे प्राणरक्षक असून, त्याच्या वापराने दुचाकीवरील प्रवास हा सुरक्षित होत आहे. तरीही ग्रामीण भागात हेल्मेट वापरायचे प्रमाण अत्यल्प म्हणजे सुमारे 1 टक्के एवढे असल्याचे चित्र आहे. त्यामुळे हेल्मेटचा वापर होण्यासाठी समाजप्रबोधनाच्या माध्यमातून, हेल्मेट वापराबाबत मानसिकता निर्माण करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. राज्यात ठिकठिकाणी बुधवारी (दि. 24) हेल्मेट वापर दिन साजरा करण्यात आला. मात्र, ग्रामीण भागात हा दिन कोठेही दिसून आला नाही.
अलीकडच्या काळात दुचाकी वाहनांची संख्या वाढल्याने, अपघाताचे प्रमाणही त्या तुलनेत वाढत चालले आहे. शरीर हा मांसाचा गोळा असल्याने दुचाकी अपघातामध्ये, अपघातग्रस्त व्यक्तीला अनेकदा मेंदूला मार लागल्याने अपंगत्व येते किंवा दुर्दैवाने जीव गमावावा लागतो. अनेकदा सर्व शरीर चांगले असूनही फक्त मेंदूला मार लागल्याने डॉक्टरांना त्या अपघातग्रस्त व्यक्तीस ब—ेनडेड म्हणून घोषित करावे लागते. त्यामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. जर हेल्मेट असेल, तर यातील सुमारे 80 टक्के प्राणहानी टाळता येते.
शासनाच्या हेल्मेट दिनानिमित्त शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी हेल्मेट सक्तीने वापरावेच, असे आवाहन केले गेले होते. जर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी दररोज हेल्मेट वापरले, तर समाजामध्ये हळूहळू निश्चितपणे जनजागृती होईल. तसेच दुसर्या बाजूला हेल्मेट वापरण्याबाबत कायद्याचा धाक दाखविणे व त्याचबरोबर जनजागृतीच्या माध्यमातून दुचाकीस्वारांमध्ये मानसिकता निर्माण करणे गरजेचे बनले आहे.
हेल्मेट परिधान करून प्रवास केल्यास वारा, ऊन, धूळ, किडे यापासून संरक्षण होते. चारचाकीच्या तुलनेत आरामदायी प्रवास हा हेल्मेट वापरामुळे करता येतो असा अनेकांचा अनुभव आहे. मात्र, अनेकजण हेल्मेट वापराकडे तशी मानसिकता अथवा सवय नसल्याने दुर्लक्ष करीत आहेत. मनुष्य हा सवयींचा गुलाम असतो.
त्यामुळे एकदा का हेल्मेट वापरायची सवय लागली तर तो मनुष्य हा कायमचे हेल्मेट वापरतो, हेल्मेटशिवाय तो एक किलोमीटर ही प्रवास करीत नाही, असा अनुभव आहे. हेल्मेट हे अनेक जण दुचाकीला सहजपणे लॉक करत आहेत त्यामुळे त्याच्या हाताळण्याचा प्रश्नही आपोआप सुटला आहे, त्यामुळे हेल्मेट वापरणे आता अधिक सोपे झाल्याचे अनेक युवकांनी सांगितले. तसेच हेल्मेट चोरीचे जाण्याचे प्रमाण शून्य आहे.