पुणे : सरकारी जमीन अतिक्रमणांच्या विळख्यात

पुणे : सरकारी जमीन अतिक्रमणांच्या विळख्यात
Published on
Updated on

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : सिंहगड रस्ता, वडगाव, धायरी भागातील गायरान, गावठाण अशा सरकारी जमिनी अतिक्रमणांच्या विळख्यात अडकल्या आहेत. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे भविष्यात एक इंचही सरकारी जमीन शिल्लक राहणार नसल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे असून, त्याचा परिणाम मूलभूत नागरी सुविधांवर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 1997 पासून 2020 पर्यंत टप्पाटप्प्याने तीन वेळा वडगाव, धायरी, सिंहगड रस्ता परिसराचा महापालिकेत समावेश करण्यात आला. लोकसंख्या वाढल्यामुळे शेकडो वर्षांपासून पडीक असलेल्या नदीपात्र,ओढे व कालव्यालगतच्या तसेच माळरानावरील सरकारी जमिनीत लोकवस्त्या, बेकायदेशीर बांधकामे मोठ्या प्रमाणात उभी राहिली, याकडे खडकवासला भाजप ओबीसी आघाडीचे अध्यक्ष अतुल चाकणकर यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

चाकणकर म्हणाले, 'प्लेग'च्या साथीत मुठा नदीच्या काठावरील गावांचे स्थलांतर झाले. मात्र, निर्जन गावठाण कागदावर तसेच राहिले. गायरान जमिनीही या भागात मोठ्या प्रमाणात होत्या. जागेअभावी उद्याने, क्रीडांगणांची सुविधा उपलब्ध नाही. गावठाण, गायरान अशा सरकारी जमिनी महापालिकेने तातडीने ताब्यात घेऊन क्रीडांगण व इतर विकासकामे राबवावी. क्रीडांगणांमुळे मुले मोबाईलपासून दूर राहतील. मुलांसह ज्येष्ठांना त्याचा लाभ होईल. तसेच पर्यावरणाचे संवर्धन होण्यासही मदत होईल.'

अतिक्रमणाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने सरकारी जमिनीला कोणी वाली उरला नसल्याचे गंभीर चित्र पुढे आले आहे. भाजपचे संघटक संदीप पोकळे म्हणाले, 'धायरी परिसरातील सरकारी मालकीच्या गायरान जमिनीत क्रीडांगण, गार्डन, रुग्णालय आदी विकासकामे राबविण्यात यावी. धायरी येथे 6 हेक्टर 55 आर इतकी सरकारी गायरान जमिनी आहे. धायरी परिसरातील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध होण्यासाठी गायरान जमिनीचा विकास करण्यात यावा.'

 

सिंहगड रोड क्षेत्रीय विभागाच्या हद्दीतील सर्व गावठाण, गायरान अशा सरकारी जमिनीवरील अतिक्रमणे रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात येणार आहेत. वाढत्या नागरिकरणांमुळे मूलभूत सुविधांसाठी या जमिनींची आवश्यकता आहे.
– प्रदीप आव्हाड, सहायक आयुक्त, सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news