बारामतीत जि. प.ची एक, तर पं. स.च्या दोन जागांची वाढ

बारामतीत जि. प.ची एक, तर पं. स.च्या दोन जागांची वाढ

राजेंद्र गलांडे

बारामती : बारामती तालुक्यात माळेगाव नगरपंचायत नव्याने स्थापन झाल्याने पूर्वीच्या माळेगाव-पणदरे जिल्हा परिषद गटाचे अस्तित्व जवळपास संपुष्टात आले आहे. नगरपंचायत झाली असली, तरी गत निवडणुकीच्या तुलनेत तालुक्यात जिल्हा परिषदेची एक, तर पंचायत समितीच्या दोन जागा यंदा वाढल्या आहेत. गत निवडणुकीत तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व सहा, पंचायत समितीच्या 12 जागा राष्ट्रवादीने एकहाती जिंकल्या होत्या. विरोधकांना तालुक्यात खातेही उघडता आले नव्हते.

बारामती नगरपरिषदेची हद्दवाढ झाल्यानंतर तालुक्यातील गट व गणांची संख्या कमी झाली होती. परिणामी, गतवेळी जिल्हा परिषदेचे सहा गट, तर पंचायत समितीचे बारा गण होते. यंदाच्या निवडणुकीसाठी 2011 चीच लोकसंख्या गृहीत धरली जाणार आहे. त्यात मध्यंतरीच्या काळात बारामती तालुक्यात माळेगाव ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतर झाल्यामुळे सुमारे 21 हजार लोकसंख्या कमी झाली. तरीही तालुक्यातील एकूण लोकसंख्या गृहीत धरून यंदा एका गटाची, दोन गणांची वाढ झाली.

सुमारे 3 लाख 1 हजार 497 लोकसंख्या गृहीत धरून गट-गणांची रचना झाली. त्यात किमान 37 हजार 500 ते 47 हजार लोकसंख्येपर्यंतचा एक गट असेल. प्रशासनाकडून गट, गणांची रचना करण्यात आली असली तरी अद्याप ती जाहीर करण्यात आलेली नाही. तालुक्यातील अनेक नेते, पक्षांचे पदाधिकारीसुद्धा गट, गणरचनेबाबत अनभिज्ञ आहेत.

अशी असेल गट-गणांची रचना

तालुक्यात सुपे, कार्‍हाटी, शिर्सुफळ-काटेवाडी, गुणवडी-पणदरे, मोरगाव- मुढाळे, निंबुत-वाघळवाडी, वडगाव निंबाळकर-सांगवी आणि निरावागज-डोर्लेवाडी, अशी गट व गणरचना तयार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. अर्थात, अद्याप प्रशासकीय स्तरावरून ती जाहीर करण्यात आलेली नाही. गट व गणरचना जाहीर झाल्यानंतर कोणती गावे कुठे जोडली गेली, यावरून राजकीय आडाखे बांधले जातील.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news