

मोहसीन शेख
बाणेर : प्रभाग क्रमांक 13 बाणेर, सूस, म्हाळुंगे हा दोन सदस्यीय असल्याने पूर्ण शहरभर या प्रभागाची चर्चा झाली. नेमका प्रभाग 13 दोन सदस्यीय कसा करण्यात आला, राष्ट्रवादीच्या स्थानिक प्रतिनिधींनी करून घेतला की, आणखी कोणी केला. प्रशासकीय कामांमध्ये हस्तक्षेप झाला का, याची चर्चा सर्वत्र आहे.
या प्रभागांमध्ये बाणेर गावठाणबरोबरच म्हाळुंगे गावठाण, सूस गावठाण अशा तीन गावठाणांच्या भागाबरोबरच सोसायटी भागही बराच मोठा असल्याने हा वर्ग निर्णायक ठरणार आहे. यामुळे या ठिकाणी राष्ट्रवादी व भाजप अशी अटीतटीची लढत होणार असली तरी शिवसेनेची भूमिका महत्त्वाची ठरेल.
प्रभाग क्रमांक 13 मध्ये जुन्या प्रभाग क्रमांक 9 चा मधील काही भाग व तसेच नवीन जोडले गेलेली दोन गावे समाविष्ट झाली आहेत. या दोन गावांत मतदार संख्या कमी असली तरी यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. दोन्ही गावांमध्ये शिवसेनेचे प्रभुत्व असून, सध्या सरपंच शिवसेनेचे आहेत. जुन्या असलेल्या प्रभाग क्रमांक 9 मध्ये चार सदस्यांपैकी तीन सदस्य भाजपचे निवडून आले होते, तर एक सदस्य काही मतांनी राष्ट्रवादीचा निवडून आला होता. राष्ट्रवादीला हा प्रभाग टिकवून धरण्यासाठी अथक प्रयत्नांबरोबरच महाविकास आघाडीतील दोन्ही पक्षांची साथ लागणार आहे.
या प्रभागांमध्ये राष्ट्रवादीबरोबरच शिवसेना व काँग्रेसचे उमेदवारांनी ही बांधणी सुरू केली आहे. परंतु, दोनच्या प्रभागांमध्ये नेमकी महाविकासआघाडी झाल्यास कोणत्या पक्षाचा विचार होणार यावरही महाविकास आघाडीचे भवितव्य अवलंबून आहे.
राष्ट्रवादीकडून या प्रभागांमध्ये नगरसेवक बाबुराव चांदेरे यांनी बांधणी सुरू केली आहे. तसेच, मागील पंचवार्षिकमध्ये चांदेरे यांचे विरोधक असलेले नगरसेवक अमोल बालवडकर ही या प्रभागातून इच्छुक असून मागील वेळेस चांदेरे विरुद्ध बालवडकर अशी बहुचर्चित राहिलेली लढत या वर्षी पूर्ण होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच राष्ट्रवादीतून भाजपात आलेले लहू बालवडकरमुळे भाजपाची ताकद वाढली.
या प्रभागातून भाजपकडून नगरसेवक अमोल बालवडकर, भाजपा उपाध्यक्ष गणेश कळमकर, लहू बालवडकर, विशाल गांधीले, नगरसेविका ज्योती कळमकर, राहुल कोकाटे, प्रकाश बालवडकर, रेश्मा योगेश विधाते. राष्ट्रवादीकडून नगरसेवक बाबुराव चांदेरे, माजी नगरसेविका रंजना मुरकुटे, पूनम विधाते, संदीप बालवडकर, लीला जीवन कळमकर. शिवसेनेकडून डॉ. दिलीप मुरकुटे, राजेंद्र धनकुडे, मयूर भांडे, बाळासाहेब भांडे, नारायण चांदेरे, काँग्रेसकडून माजी नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर, माजी नगरसेवक शिवाजी बांगर, रंगनाथ ताम्हाणे, स्नेहल बांगर, धनश्री सुहास भोते, मनसे सारिका अनिकेत मुरकुटे, किरण रायकर, अमित राऊत तर पक्ष निश्चित नसलेल्यांमध्ये जयेश मुरकुटे, प्रमिला मुरकुटे आदी उमेदवारीसाठी इच्छुक आहेत.
बाणेर, सूस, म्हाळुंगे, रिव्हीरेसा सोसायटी, धनकुडे वस्ती, वर्षा पार्क सोसायटी, मुरकुटे वस्ती, विधाते वस्ती