हिंदूंना ताकद आणि हिंमत देण्यासाठी दौंडमध्ये : आमदार नीतेश राणे

हिंदूंना ताकद आणि हिंमत देण्यासाठी दौंडमध्ये : आमदार नीतेश राणे

दौंड; वृत्तसेवा : दौंड येथील दोन कुटुंबांबरोबरच शहरातील हिंदू समाजामध्ये जे काही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे ते पोलिस खात्याने या सर्व गोष्टींना प्रोत्साहन दिल्यामुळे झाले आहे. त्याच्याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आणि हिंदू समाजाला एक आमदार-खासदार नाही तर एक हिंदू म्हणून ताकद आणि हिंमत देण्यासाठी मी आज दौंडमध्ये आलो असल्याचे आमदार नीतेश राणे यांनी सांगितले. दौंड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष बादशाह शेख यांच्यासह 22 लोकांवर हिंदू कुटुंबाला जिवे मारणे, धमकावणे आणि अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दौंड पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात गुरुवारी (दि. 17) आमदार नीतेश राणे यांनी दौंड येथे पोलिस विभागाची भेट घेऊन पत्रकार परिषद घेतली. याप्रसंगी ते बोलत होते.

दौंड शहरात दि. 20 ऑक्टोबर रोजी दोन कुटुंबांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता व त्याची तक्रार दौंड पोलिसांनी घेतली नव्हती. त्यातील एका कुटुंबाने थेट राष्ट्रीय आयोगाकडे याबाबतची तक्रार केली. त्यानंतर दौंड पोलिस ठाण्यात माजी नगराध्यक्ष बादशाह शेख यांच्यासह त्यांच्या सहा साथीदारांवर गुन्हा दाखल झाला. हा गुन्हा दाखल होण्यापूर्वी बादशाह शेख यांनी पोलिस ठाण्यात महिलेला दमदाटी केली व शिवीगाळ केली, तसेच तिला जातीयवादी शिवीगाळ केल्याप्रकरणी या महिलेने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा दाखल होऊन 10 दिवस उलटले तरी या संशयितांना दौंड पोलिसांनी अटक केली नाही. त्यामुळे दौंड येथे आमदार नीतेश राणे यांनी त्यांच्याशी संपर्क केला व ज्या कुटुंबावर अन्याय झाला आहे, त्यांना न्याय मिळावा म्हणून आ. नीतेश राणे हे दौंड पोलिस ठाण्यात पोलिसांना जाब विचारण्यासाठी गेले.

त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये बोलताना आ. नीतेश राणे म्हणाले, बादशहा नावाचा जो कोणी आरोपी आहे त्याची जी हिंमत दौंड शहरात वाढलीय, तो कोणत्या पक्षाचा आणि कोणत्या पदावर आहे त्याचं माझं काही लेणं-देणं नाही. मात्र त्याने दौंड शहरात दहशतीचे वातावरण निर्माण केलंय, त्याचे जे या ठिकाणच्या पोलिसांबरोबर लागेबांधे आहेत त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. हे कोणाच्या राज्यात सुरू आहे, कोण राज्यकर्ते आहेत हे त्या बादशहाने समजून घ्यावं. तुझ्यासारखे शंभर बादशहा मी माझ्या खिशात घेऊन फिरतोय, असा सज्जड इशारा आमदार नीतेश राणे यांनी यावेळी दिला.

आगामी 48 तासांमध्ये दौंड पोलिसांनी बादशाह शेख व त्याच्या सहकाऱ्यांना अटक केली नाही तर ही बाब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घालणार आहे. हे लोक जातीयवादी असून ते हिंदू समाजावर अन्याय करतात. त्यांचे व पोलिसांचे लागेबांधे आहेत. दौंड शहरात हिंदू समाजावर जर कोणी अन्याय केला तर त्याची गय केली जाणार नाही. पोलिसांनी शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम करावे, तसेच या प्रकरणाची सीआयडी चौकशी करावी. हा प्रश्न हिवाळी अधिवेशनामध्ये मांडणार असल्याचे आ. राणे म्हणाले.

तर बादशहाची दौंड शहरातून धिंड काढणार
हिंदू समाजाने अन्यायाविरुद्ध लढा द्यावा. तुम्ही गप्प बसू नका, असे आवाहनदेखील आ. राणे यांनी यावेळी केले. अंगावर आला तर शिंगावर घ्यायला शिका, तुम्हाला लागेल ती ताकद द्यायला आम्ही तयार आहोत. तुमच्या संरक्षणासाठी एवढ्या लांबून नीतेश राणेला यायला लागलं त्याबद्दल थोडा विचार करा. कोण बादशहा नावाचा इसम येतो आपल्या महिलांना घाबरतो, धमकावतो. आपण हिंदू समाज म्हणून सहन करत राहायचं, गप्प बसायचं हे आता या राज्यात चालणार नाही. यापुढे असे कुठलेही प्रकार घडले तर नुसते शांततेत मोर्चा होऊन थांबणार नाही. त्या बादशाहची पूर्ण शहरामध्ये धिंड काढेन, असा इशारा आमदार नीतेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दिला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news