सोमेश्वरनगर : नवीन हॉलमार्क कायद्याची अंमलबजावणी; किरण आळंदीकर यांची माहिती

सोमेश्वरनगर : नवीन हॉलमार्क कायद्याची अंमलबजावणी; किरण आळंदीकर यांची माहिती

सोमेश्वरनगर; पुढारी वृत्तसेवा : 1 एप्रिलपासून दागिन्यांवर 6 अंकी एचयूआयडी म्हणजेच युनिक आयडी क्रमांक असावा, असा नवीन कायदा केंद्र सरकारने केला असून, पूर्वीची 4 अंकी हॉलमार्क पद्धत संपुष्टात येणार असल्याची माहिती इंडिया बुलिअन अ‍ॅन्ड ज्वेलर्स असोसिएशनचे राज्य समन्वयक किरण आळंदीकर यांनी दिली. 1 जुलै 2021 पासून देशात हॉलमार्क कायदा सक्तीचा करण्यात आला होता. या वेळी भारतीय मानक ब्युरो बीआयएस या संस्थेकडे 43153 नोंदणीकृत सराफ व्यावसायिक होते.

या व्यवसायिकांकडे हॉलमार्क केलेले किती दागिने आहेत ते त्यांनी घोषित करावेत, असे बीआयएसकडून परिपत्रक काढण्यात आले होते. या वेळी 16243 सरांफानी आपला स्टॉक घोषित केला. केंद्र सरकारने काढलेल्या परिपत्रकात अशा स्टॉक घोषित केलेल्या व्यावसायिकांना नवीन पद्धतीने एचयूआयडी करण्यास आणखी 2 महिने मुदत वाढवून दिली असून, जुन्या पद्धतीने हॉलमार्कचे नवीन एचयूआयडी करताना दरामध्ये सवलत देण्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

या निर्णयाचा काही प्रमाणात सराफ व्यावसायिकांना दिलासा मिळाला असल्याचे आळंदीकर यांनी सांगितले. पूर्वी हॉलमार्क सेंटर मर्यादित असल्याने शहरी भागामध्ये हॉलमार्क प्रमाणित दागिन्यांची मोठ्या प्रमाणात विक्री होत होती. परंतु, एचयूआयडीचा कायदा सक्तीचा झाल्याने एप्रिल पासून ग्रामीण भागातदेखील सर्वत्र हॉलमार्क प्रमाणित दागिने ग्राहकांना उपलब्ध होतील.

ग्राहकांची फसवणूक होऊ नये, शुद्ध सोने मिळावे, व्यवसायात पारदर्शकता राहावी, या उद्देशाने लागू केलेल्या कायद्याचे स्वागतच आहे, परंतु त्यातील जाचक तरतुदीचा पुनर्विचार व्हावा, असे आळंदीकर यांनी सांगितले. जुन्या दागिन्यांबाबत ग्राहकांमध्ये संभ्रम असून, जुने दागिने हॉलमार्क असले किंवा नसले तरी ते दागिने बदलताना किंवा मोडताना त्याचे मूल्य कमी होणार नसल्याचे आळंदीकर यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news