असाक्षरांची व स्वयंसेवकांची शाळेकडे नोंदणी करावी

असाक्षरांची व स्वयंसेवकांची शाळेकडे नोंदणी करावी
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत असाक्षरांची व स्वयंसेवकांची लगतच्या शाळेकडे नोंदणी करावी, असे आवाहन योजना शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी केले आहे. राज्यात शिक्षक संघटनांनी घातलेल्या बहिष्कारामुळे या योजनेचे काम मंदावले आहे. या पार्श्वभूमीवर महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्रवासीयांना शिक्षण संचालकांनी भावनिक साद घातली असून, लोकचळवळ उभारून राज्याला शंभर टक्के साक्षर करण्यासाठी संकल्प करण्याचे आवाहन केले आहे. पालकर यांनी प्रौढ साक्षरताविषयक कार्यक्रमाबाबत सांगितले की, स्वातंत्र्य मिळाल्यापासून शासनामार्फत देशामध्ये एकूण 9 साक्षरता मोहिमा राबविण्यात आल्या.

संबंधित बातम्या :

सन 2011 च्या जनगणनेनुसार देशात प्रौढ निरक्षरांची संख्या 25 कोटी 78 लक्ष एवढी होती. आजही देशात 18 कोटी निरक्षर व्यक्ती आहेत. महाराष्ट्रामध्ये 15 व त्या वरील वयोगटातील 1 कोटी 63 लाख निरक्षर व्यक्ती असल्याचे सन 2011 च्या जनगणनेतून निदर्शनास आले आहे. नवभारत साक्षरता कार्यक्रमाबद्दल पालकर म्हणाले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मधील शिफारशीनुसार व संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास ध्येयांनुसार सन 2030 पर्यंत 100 टक्के साक्षरतेचे उद्दिष्ट प्राप्त करावयाचे आहे. यासाठी केंद्र शासनाने राज्यांच्या मदतीने नवभारत साक्षरता कार्यक्रम एप्रिल 2022 पासून सुरू केला आहे, तो मार्च 2027 पर्यंत चालणार आहे.

या योजनेंतर्गत साक्षरतेची व्याख्या स्पष्ट करताना त्यांनी नमूद केले आहे की, जागतिकीकरणाची आव्हाने पेलणारा भारतीय नागरिक तयार व्हावा, या उद्देशाने सर्वांसाठी शिक्षण (प्रौढ शिक्षण) अंतर्गत वाचन, लेखन व संख्याज्ञान या मूलभूत कौशल्याशिवाय त्याहूनही पुढे आर्थिक साक्षरता, कायदेविषयक साक्षरता, डिजिटल साक्षरता, आपत्ती व्यवस्थापन कौशल्य, आरोग्याची काळजी व जागरूकता, बालसंगोपन आणि शिक्षण, कुटुंबकल्याण इत्यादी कौशल्ये व साक्षरता यामध्ये अंतर्भूत आहे. महाराष्ट्रातील जनतेस त्यांनी आवाहन केले आहे की, आपण आपल्या कुटुंबातील असाक्षरांची नोंदणी लगतच्या शाळेकडे करावी. समाजातील शिक्षित असलेल्या घटकांपैकी जे वेळ देऊ शकतात, अशांनी लगतच्या शाळेकडे स्वयंस्फूर्तीने विनामोबदला काम करण्यासाठी स्वयंसेवक म्हणून नोंदणी करावी. कुटुंबातील असाक्षरांना शिक्षित सदस्यांनी साक्षर करण्याचा संकल्प करावा.

योजना यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करा
केंद्र शासनाचे 'जन जन साक्षर' आणि राज्याचे 'साक्षरतेकडून समृध्दीकडे' हे या योजनेचे घोषवाक्य प्रत्यक्षात उतरविण्यासाठी योजना यशस्वी करण्यासाठी व पर्यायाने सक्षम भारत घडविण्यासाठी कटिबद्ध होण्याचे आवाहनही डॉ. पालकर यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news