पुणे : एकाच इमारतीचा 20 वेळा बेकायदा व्यवहार; पाच महिलांसह सहा जणांना अटक

प्रातिनिधिक छायाचित्र.
प्रातिनिधिक छायाचित्र.
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा: कोंढवा खुर्द येथील एका 4 मजली इमारतीच्या विक्रीचा व्यवहार करण्यासाठी कागदपत्रे घेतल्यानंतर त्यावर एका वर्षात तब्बल 20 हून अधिक वेळा व्यवहार करून कोट्यवधीचे कर्ज काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मार्केट यार्ड पोलिसांनी 5 महिलांसह सहा जणांना अटक केली आहे. सर्वांत गंभीर प्रकार म्हणजे या इमारतीवर इतके व्यवहार झाले, याची मालक असलेल्या चार महिलांना अजिबात कल्पना नव्हती.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंजली सत्यदेव गुप्ता, नीरू अनिल गुप्ता, किरण देवेंद्र चढ्ढा आणि सुमन अशोक खंडागळे यांनी मिळून कोंढवा खुर्द येथील मालमत्ता खरेदी केली होती. त्यानंतर 2005 मध्ये त्यावर त्यांनी 4 मजली नंदनवन ही इमारत बांधली. चारही कुटुंबे प्रत्येकी एका मजल्यावर वास्तव्यास होती. दरम्यान, त्यांनी घरगुती कारणाने 2020 मध्ये ही इमारत विकण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी विनय पाटील व इतर एजंटांना सांगितले होते.

त्यासाठी त्यांनी मालमत्तेचे खरेदीखत व इतर कागदपत्रे त्यांच्याकडे दिली होती. मे 2021 पासून त्यांची प्रॉपर्टी पाहण्यास लोक येऊ लागले. काही बँकांचे लोकही तिचे मूल्यांकन करण्यासाठी येऊन गेले. विनय पाटील हा 'तुमची इमारत जुनी आहे. एरिया चांगला नाही. गर्दीचा आहे, त्यामुळे खूप लोकांना दाखवावी लागते,' अशी कारणे सांगत असे. नोव्हेंबर 2021 मध्ये एकाशी 3 कोटी 40 लाख रुपयांचा व्यवहार ठरला होता.

मात्र, त्यानंतर कर्ज होत नसल्याचे सांगून पुढे व्यवहार पूर्ण केला नाही. या सर्व काळात ग्राहक व बँकेचे लोक असे मिळून 100 च्या वर लोक इमारत पाहून गेले होते. दरम्यान, 4 ऑगस्ट 2022 रोजी कॉसमॉस बँकेचे लोक आले. त्यांनी या महिलांकडे तुम्ही ही मालमत्ता कोणाला विकली का?अशी चौकशी केली. तेव्हा त्यांनी आम्ही कोणाला विकली नसल्याचे सांगितले. त्यांच्याकडील कागदपत्रांत आमचे हे फोटो नसल्याने सांगितले.

असा आला प्रकार समोर
विनय पाटील याने इतर महिलांना हाताशी धरून हवेली उपनिबंधक कार्यालयात या महिलांचे बनावट कागदपत्र तयार करून फेब—ुवारीमध्ये दस्तनोंदणी केली होती. त्याच महिलांना घेऊन पुन्हा त्याच मालमत्तेच्या नवीन दस्तनोंदणीसाठी ते आले होते. त्यानंतर तेथील उपनिबंधकाला शंका आली. तेव्हा त्यांनी तपासणी केल्यावर एकच प्रकार सर्व्हे नंबरमध्ये थोडासा बदल करून एक वर्षभरात 20 हून अधिक व्यवहार झाल्याचे आढळून आले.

त्यात 3 वेळा ही मालमत्ता बँकांकडे गहाण ठेवून त्यावर मोठे कर्ज काढले गेल्याचे आढळून आले. त्यानंतर उपनिबंधकांनी मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात याची तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी मूळ मालकांविरुद्धच गुन्हा दाखल केला. प्रत्यक्षात या सर्व प्रकारात त्यांना काहीच माहिती नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर पोलिसांनी तपास करून या मूळ महिला मालकांच्या जागी उभ्या राहिलेल्या तोतया 5 महिलांसह विनय पाटील याला अटक केली आहे. सहायक पोलूस निरीक्षक मदन कांबळे अधिक तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news