निनाद देशमुख
पुणे: पुण्यातील अतिक्रमणांवर महानगरपालिकेच्या अतिक्रमण आणि बांधकाम विभागाने गेल्या महिन्यात संयुक्त कारवाई केली. फर्ग्युसन रस्ता, पेठांमधील परिसर तसेच सारसबागे-जवळील खाऊ गल्लीवरही बुलडोझर चालवण्यात आला होता.
मात्र, कारवाई करून पथक गेल्यावर पुन्हा दुकाने थाटली जात असूनही पालिकेची ही कारवाई फार्स ठरत आहे. त्यामुळे अतिक्रमण कारवाईचा केवळ दिखावा केला जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तर आर्थिक व्यवहार झाल्यावर अतिक्रमण निरीक्षक जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोपदेखील केला जात आहे. (Latest Pune News)
पुणे शहरातील प्रत्येक ठिकाणी अतिक्रमणाचा सामना शहरातील नागरिकांना करावा लागत आहे. शहरातील मध्यवर्ती पेठांसह, बाजार पेठेशिवाय इतर रस्त्यांवर अतिक्रमणे वाढली आहेत. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून जाताना जीव मुठीत धरून जावे लागत आहे.
शहरातील अतिक्रमणाचा प्रश्न सोडवण्यासाठी आयुक्त नवल किशोर राम यांनी आदेश दिले होते. त्यानंतर गेल्या महिन्याभरात शहरातील विविध भागांत अतिक्रमणविभाग आणि बांधकाम विभागामार्फत कारवाई करण्यात आली. मात्र, ही कारवाई झाल्यावरही पुन्हा व्यावसायिक, पथारीवाले यांनी रस्त्यावर दुकाने थाटली आहे.
पथकातील कर्मचार्यांकडून मिळते कारवाईची टीप
महापालिकेने शहरातील विविध झोनमध्ये अतिक्रमण कारवाईच्या नियोजनाचा आराखडा तयार केला होता. त्यानुसार पथक कारवाई करण्यासाठी निघताच कारवाईची माहिती स्टॉलधारक, हातगाडी, पथारी व्यावसायिकांना मिळते. यामुळे दुकानदार त्यांचे दुकानाबाहेरील साहित्य आतमध्ये घेतात. त्यामुळे अवघ्या 5-10 मिनिटांत रस्त्यावरील अनधिकृत व्यावसायिक गायब होतात. अतिक्रमण पथकाची गाडी निघून गेल्यानंतर परत रस्ता अतिक्रमणांनी गजबजून जातो. अतिक्रमणविरोधी पथकातील कर्मचारीच ही टीप देत असल्याने महापालिका केवळ दिखाऊ कारवाई करते. त्यामुळे पदपथावर पुन्हा अतिक्रमण होत आहे.
सारसबागेजवळील खाऊ गल्लीत पुन्हा अतिक्रमण
सारसबागेजवळील खाऊ गल्लीवर दोन आठवड्यापूर्वी महानगरपालिकेने मोठी कारवाई करत येथील दुकाने आणि खेळणीची दुकाने हटवली होती. या कारवाईची बरीच चर्चा झाली. मात्र, अतिक्रमण विभागाची पाठ फिरताच या ठिकाणी व्यावसायिकांनी पुन्हा शेड मारून अतिक्रमण सुरू केले आहे. त्यामुळे येथील अतिक्रमणावर राजकीय वरदहस्त असल्याची चर्चा रंगली आहे.
फर्ग्युसन रस्त्यावर कारवाईनंतर पुन्हा थाटली दुकाने
पुण्यातील सर्वात गजबजलेला रस्ता असलेल्या फर्ग्युसन रस्त्यावर अतिक्रमण आणि बांधकाम विभागाने मोठी कारवाई केली होती. येथील पथारी व्यावसायिक व काही कायमस्वरूपी बांधकामे पाडण्यात आली होती. ही कारवाई झाल्यावर आता पुन्हा या ठिकाणी दुकाने थाटली आहेत. या मार्गावरील पदपथ तर विक्रेत्यांनी काबिज केले आहे. यामुळे नागरिकांना थेट रस्त्यावरून चालावे लागत आहे.
कायद्यात दंड भरून जप्त केलेला माल परत देण्याची तरतूद आहे. यामुळे अनेक जण दंड भरून माल परत घेऊन पुन्हा रस्त्यावर दुकाने थाटत आहेत. जी साईड मार्जिनमधील बांधकामे आहेत, त्यावर बांधकाम विभागाने कारवाई करणे अपेक्षित आहे. फर्ग्युसन रस्त्यावर पुन्हा अतिक्रमण होऊ नये, यासाठी आम्ही कायमस्वरूपी पथक या रस्त्यावर तैनात करणार आहोत. यासोबतच तीन वेळा नोटीस देऊनही जर पुन्हा अतिक्रमण केले तर अशा व्यावसायिकांचा परवाना रद्द करण्याच्या हेतूने पथविक्रेता समिती समोर तसा प्रस्ताव आम्ही ठेवणार आहोत.
- संदीप खलाटे, अतिक्रमण विभागप्रमुख,
पुणे महानगरपालिका महानगरपालिकेचे अधिकारी जाणीवपूर्वक शहरातील अतिक्रमणांकडे दुर्लक्ष करत आहेत. कारवाई टाळण्यासाठी अतिक्रमण महानिरीक्षक पथारीवाल्यांकडून चिरीमिरी घेत आहेत. अनेक ठिकाणी हॉटेलचालकांनी साइड मार्जिनमध्ये अवैध बांधकाम केले आहे. असे असताना महानगरपालिकेचे अधिकारी कारवाई का करत नाहीत?
- अरविंद शिंदे, शहराध्यक्ष, काँग्रेस