वाकी खुर्द येथे असे फ्लेक्स लावण्यात आले आहेत. (छाया : अविनाश दुधवडे)
वाकी खुर्द येथे असे फ्लेक्स लावण्यात आले आहेत. (छाया : अविनाश दुधवडे)

वाकी खुर्द येथे बेकायदा प्लॉटिंगला चाप; ग्रामपंचायतीने लावले गावात फ्लेक्स

चाकण; पुढारी वृत्तसेवा: खेड तालुक्यात बेकायदा प्लॉटिंगचा सुळसुळाट झाला आहे. नागरिकांना फसवून आणि कुठल्याही सोयीसुविधा न देता केलेल्या बेकायदा प्लॉटिंग व्यवसायात अनेक राजकीय वरदहस्त असलेली मंडळी शिरली आहेत. त्यामुळे चाकणजवळील वाकी खुर्द (ता. खेड) ग्रामपंचायतीने ठराव करून अशा बेकायदा प्लॉटिंगला चाप लावला आहे.

चाकण आणि एमआयडीसीच्या चारही बाजूंच्या आठ-दहा किलोमीटर अंतरावरील ग्रामपंचायत हद्दीत जोर धरलेल्या प्लॉटिंगच्या बेकायदा प्रकारांकडे महसूल प्रशासन अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे वाकी खुर्द ग्रामपंचायतीच्या कारभाऱ्यांनी या प्रकारांना चाप लावण्यासाठी कंबर कसली आहे. भूमाफियांसह दलालांनी सर्वत्र गुपचूप शेतजमिनीचे बेकायदा प्लॉटिंग पाडून काळा पैसा कमविण्याचा गोरखधंदा चालविला आहे.

चाकण भागातील प्लॉटिंग दलालांनी महसूल प्रशासनातीलच अनेकांना हाताशी धरून डोंगर, टेकड्या, ओढ्यांमधील जमिनींचे आणि वादातीत व इनामी जमिनींचे प्लॉटिंग चालविले आहे. गोरगरीब शेतकर्‍यांच्या जमिनी कवडीमोल भावाने लाटून चौपट, पाचपट दराने असे भूखंड बेकायदेशीरपणे विक्री केले जात आहेत.

महसूल विभागातील मंडळीदेखील लालसेतून कायद्यातील पळवाटा दाखवत अशा नोंदी सातबारावर घेत आहेत. त्यामुळे वाकी खुर्द ग्रामपंचायतीने गावात ठिकठिकाणी फ्लेक्स लावून अशा बेकायदा प्लॉटिंगमध्ये गुंठा-अर्धा गुंठा जमिनी खरेदी करू नयेत, असे आवाहन  केले आहे.

पीएमआरडीएकडून नकाशा मंजूर करून आणि सर्व सुविधा देऊनच ग्रामपंचायत हद्दीत प्लॉटिंग करावे; अन्यथा याबाबत पीएमआरडीएला कळविण्यात येईल, असा स्पष्ट इशारा बेकायदा प्लॉटिंग करणार्‍या मंडळींना दिला असल्याचे सरपंच अनुताई काळे, उपसरपंच प्रीती गायकवाड, माजी उपसरपंच संदीप जाधव, संतोष वहिले, सदस्य अमोल जाधव, मयूर परदेशी, मंगल जाधव आदींसह सर्व सदस्यांनी दिला आहे.

logo
Pudhari News
pudhari.news