पुणे : कात्रज-कोंढवा रस्त्यावरील मौजे कोंढवा बुद्रुक येथील सर्व्हे क्रमांक 56 मधील पुणे महापालिकेच्या मोकळ्या जागेवर एकाने अनधिकृतपणे जड वाहनांचे वाहनतळ सुरू केले आहे. ही जागा पीएमपीच्या बस उभ्या करण्यासाठी व या ठिकाणी डेपो आरक्षित आहे. संबंधित व्यक्ती येथे वाहने उभी करण्यासाठी 150 ते 200 रुपये वसूल करीत असल्याचे समोर आले आहे. संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधींनी केली आहे.
शहरात पुणे महापालिकेच्या अनेक मोकळ्या जागा आहेत. येथे विकासात्मक कामे होणे अपेक्षित आहे. महानगरपालिकेच्या नियोजनानुसार या जागांवर भाजी मंडई, बहुउद्देशीय हॉल, दवाखाने, रुग्णालय, अग्निशमन दल, बाग, व्यायामशाळा, शैक्षणिक संकुल आदी उभारण्यात येणार आहे. महापालिकेच्या मालमत्ता विभाग व भवन विभागाकडून या जागांवर विकासकामे करणे अपेक्षित आहे. मात्र, अनेक जागा पडून असल्याने या मोकळ्या जागांवर आता अनधिकृत व्यवसाय थाटले जात आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांकडून या जागा ताब्यात घेतल्या जात आहेत.
कात्रज-कोंढवा रस्त्यावरील मौजे कोंढवा बुद्रुक येथील सर्व्हे क्रमांक 56 मधील पुणे महापालिकेची जागा आहे. ही मोकळी जागा पीएमपीचा डेपो आणि वाहनतळासाठी आरक्षित आहे. मात्र, येथे एका व्यक्तीने अनधिकृत वाहनतळ सुरू केल्याने याप्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते व माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांच्याकडे तक्रार केली आहे. याबाबत त्यांनी महापालिकेकडे निवेदन दिले आहे. संबंधित व्यक्तीवर तातडीने कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. राजकीय पाठबळामुळे 2 वर्षांपासून कारवाई होत नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
या जागेवर महिनाभरासाठी अवजड वाहनांकडून दररोज 100 रुपये, दहाचाकी वाहनांसाठी 300 रुपये, तर मासिक भाडे 1000 रुपये वसूल केले जातात. हे वाहनतळ अनधिकृत असून, येथे गाड्यांच्या खरेदी-विक्रीचा देखील व्यवसाय होत आहे. या जागेवर पीएमपीचा डेपो आणि वाहनतळ तयार होणे अपेक्षित असताना या जागेचा गैरवापर केला जात आहे. यासंदर्भात मिलिंद कांबळे यांनी महापालिकेकडे 19 एप्रिल 2024 पासून 6 एप्रिल 2025 पर्यंत तब्बल 32 वेळा तक्रारी व स्मरणपत्रे दिली, तरीही महापालिकेने यावर कारवाई केली नाही. त्यामुळे आता संबंधित व्यक्तीवर कारवाई आणि जागेचा ताबा घेत सीमाभिंत बांधावी, अशी मागणी केली आहे
महापालिका अन् पोलिसांचे स्पष्टीकरण
मालमत्ता विभागाच्या प्रमुख वसुंधरा बारवे म्हणाल्या, वाहतूक पोलिसांनी जड वाहनांच्या पार्किंगसाठी जागा देण्याबाबत पत्र दिले होते. या जागेच्या ताब्याबाबत प्रकल्प विभागाला 2 आठवड्यांपूर्वी कळविले आहे. ही जागा पीएमपीसाठी आरक्षित ठेवण्यात आली आहे. लवकरच टेंडर प्रक्रिया सुरू होईल व निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.