

बेळगाव : कोंडसकोप्प (ता. बेळगाव) गावाला सुरळीत बस सोडण्यात येत नाही. यामुळे विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिणामी संतप्त बनलेल्या विद्यार्थी, गावकर्यांनी बुधवारी (दि.16) सकाळी पुणे-बंगळूर महामार्ग रोखला. यामुळे रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी मध्यस्ती करत आंदोलन मागे घेण्यास भाग पाडले.
पुणे-बंगळूर महामार्गापासून कोंडसकोप्प गाव आत सुमारे दोन किमी अंतरावर वसले आहे. गावाला सीबीटीपासून बस सोडण्यात येते. परंतु, ही बससेवा अनियमित आहे. अनेकदा केकेकोप्प परिसरात धावणार्या बस कोंडसकोप्प क्रॉसला थांबविण्यात येत नाहीत. यामुळे विद्यार्थी, प्रवाशांना कसरत करावी लागते.
सुरळीत बससेवा करण्यात यावी, यासाठी अनेकवेळा गावकर्यांनी परिवहन महामंडळाच्या अधिकार्यांना निवेदने दिली. त्यांनी केवळ आश्वासने दिली. बससेवा अनियमितत धावत आहे. यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी अचानक रास्तारोको आंदोलन सुरू केली.
आंदोलनांमुळे रस्त्यावर वाहनांच्या रांगा उभ्या राहिल्या. ही माहिती बागेवाडी पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. विद्यार्थी, गावकर्यांना बससेवा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले. त्याचबरोबर याबाबत जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्याची सूचना केली. यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले.
दरम्यान, रास्तारोको थांबवून विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले. गावची बससेवा सुरळीत करण्याची मागणी केली. जिल्हाधिकार्यांना मागणीचे निवेदन दिले. त्यांनी बससेवा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.