

पुणे: पुणे जिल्ह्यातील गर्भलिंगनिदानाच्या बेकायदेशीर रॅकेटचा पर्दाफाश झाल्यानंतर या गुन्ह्याची व्याप्ती अपेक्षेपेक्षा मोठी असल्याचे तपासातून समोर आले आहे. मागील पाच वर्षांत हजारो महिलांचे गर्भलिंगनिदान करून बहुसंख्य गर्भपात करण्यात आल्याची माहिती उघड झाली असून, या रॅकेटची पाळेमुळे पुण्यासह तीन ते चार जिल्ह्यांपर्यंत पोहचल्याचा संशय आहे. पुणे ग््राामीण पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल्ल यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत तपासाबाबतची माहिती दिली.
केडगाव परिसरात कारवाई करीत कुख्यात आरोपी अण्णासाहेब गिरी (रा. केडगाव, ता. दौंड) आणि डॉ. अतुल अंकुश जाधव (रा. लोहगाव) यांना अटक केली आहे. तर डॉ. नरेंद्र ठाकरे, मंदार माळी आणि सुंदरम कदम यांच्याविरुद्ध गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र (पीसीपीएनडीटी) कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून, त्यांचा शोध सुरू आहे.
आरोग्य विभागाकडे गर्भलिंगनिदानाचा व्हिडीओ प्राप्त झाल्यानंतर डॉ. सचिन विठ्ठल गुजर यांनी यवत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानंतर सुरू झालेल्या तपासात गिरी हा गावोगावी फिरून महिलांची सोनोग््रााफी करीत असल्याचे उघड झाले. विशेष म्हणजे, तो कोणताही वैद्यकीय तज्ज्ञ नसून बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर फार्मसीचे शिक्षण अर्धवट सोडून मेडिकल रिप्रेझंटेटिव्ह म्हणून काम करीत होता. त्याच अनुभवाच्या आधारे त्याने हा बेकायदेशीर व्यवसाय सुरू केल्याचे समोर आले आहे.
पोर्टेबल मशिन आणि गर्भपाताचे कनेक्शन
तपासात गिरीने अडीच वर्षांपूर्वी पोर्टेबल सोनोग््रााफी मशिन नरेंद्र ठाकरेकडून घेतल्याचे उघड झाले आहे. तसेच, गर्भलिंग निदानानंतर काही महिलांना गर्भपातासाठी वाघोलीतील डॉ. अतुल जाधव यांच्या दवाखान्यात पाठविले जात असल्याची माहितीही समोर आली आहे.
गर्भलिंगनिदानासाठी 40 ते 60 हजार रुपये
तपासानुसार आरोपी प्रत्येक गर्भलिंगनिदानासाठी 40 ते 60 हजार रुपये आकारत होता. आर्थिकदृष्ट्या सक्षम कुटुंबांकडून यापेक्षाही जास्त रक्कम घेतली जात असल्याचे निष्पन्न झाले आहे. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
महिलांचा शोध सुरू, कुटुंबीयांची भूमिका तपासणार
आत्तापर्यंत 15 साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले असून, बँक व्यवहार, मोबाईल सीडीआर आणि इतर तांत्रिक पुराव्यांचे विश्लेषण सुरू आहे. आरोपीने मागील पाच वर्षांत हजारो महिलांची गर्भलिंग चाचणी केली असण्याची शक्यता असून, संबंधित महिलांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. गर्भलिंगनिदान करून घेतलेल्या कुटुंबांची भूमिकाही तपासली जात असून, आवश्यकतेनुसार त्यांच्यावरही कारवाई होऊ शकते.
12 ते 15 डॉक्टर रडारवर
मुख्य आरोपी गिरी याचा मोबाईल आणि तांत्रिक तपासातून तो 12 ते 15 डॉक्टरांच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. त्यांच्या आर्थिक व्यवहारांसह या रॅकेटमधील भूमिकेची चौकशी सुरू आहे.
गर्भलिंगनिदान करणाऱ्याला अटक केली असून, त्याच्या साथीदारांचा शोध सुरू आहे. तांत्रिक तपासात 12 ते 15 डॉक्टरांच्या संपर्काचे धागेदोरे समोर आले आहेत. या संपूर्ण रॅकेटची पाळेमुळे शोधून काढण्यासाठी तपासाला गती देण्यात आली आहे.
संदीपसिंग गिल्ल, पोलिस अधीक्षक, पुणे ग््राामीण