पिंपरी : शादी में बिन बुलाए मेहमान ! आमंत्रण नसतानाही लग्नात जेवाल तर होईल कारावास

पिंपरी : शादी में बिन बुलाए मेहमान ! आमंत्रण नसतानाही लग्नात जेवाल तर होईल कारावास

राहुल हातोले
पिंपरी : लग्नाचे आमंत्रण नसतानाही जर तुम्ही तेथे गेला अन् लग्नातल्या जेवणावर ताव मारल्यास खबरदार! वधू अथवा वराकडील मंडळींना तुमच्याबाबत बिन बुलाए मेहमान हो, अशी शंका आली अन् त्यांनी पोलिसांत तक्रार दिल्यास तुम्हाला तीन महिन्यांचा कारावास होऊ शकतो. आपल्या सर्वांना थ्री इडिएट चित्रपटातील द़ृश्य आठवत असेल. लग्नाचे आमंत्रण नसतानाही या चित्रपटातील तीनही नायक लग्नात जाऊन जेवण करतात; मात्र वधू पित्याला या तिघांविषयी शंका आल्याने या तिघांचाही अपमान केला जातो. सत्य परिस्थितीनुसार खरोखरच आमंत्रण नसलेल्या लग्नात आपण जेवणासाठी जाणार असल्यास नक्की विचार करा.

काही महाभाग लग्नातील विविध पदार्थ खाण्यासाठी आमंत्रण नसतानाही लग्नात घुसतात. घराजवळील लॉन, मंगल कार्यालयात कुणाला शंका येऊ नये, म्हणून वर्‍हाडी मंडळीसारखा पोशाख परिधान करत लग्नात प्रवेश करतात. मात्र वधू आणि वराकडील मंडळींना जर शंका आल्यास ते पोलिसांत तक्रार करू शकतात. आणि आपल्याला लग्नातील जेवण महागात पडून, तुरुंगाची हवा खावी लागू शकते.
शंका नको म्हणून वधू-वरास शुभेच्छाही!

बिन बुलाए मेहमान असलेल्या व्यक्ती कुणाला शंका येऊ नये, म्हणून लग्नात हजर राहून वधू-वराला शुभेच्छाही देतात. वधू-वरांना संबंधित व्यक्ती आपल्यापैकी कुणाचे नातेवाईक असतील, असे समजून त्यांना जेवणाचा आग्रह केला जातो. या संधीचा ते फायदा घेतात.

गर्दीचा फायदा
लग्नात विनाआमंत्रणाचा जेवणावर ताव मारणार्‍यांना गर्दीचा फायदा होतो. या गर्दीमध्ये वधू व वर पित्यांसह सर्वच व्यस्त असतात. तसेच लग्नामध्ये कुणी उपाशी तर राहिले नसेल ना, याच चिंतेत ही मंडळी असल्याने या गोष्टीचाही गैरफायदा बिन बुलाए मेहमान घेतात.

नातेवाईकांना बसतो भुर्दंड
बर्‍याच लग्नांमध्ये ठरलेल्या वर्‍हाडांच्या संख्येनुसारच जेवणाच्या ताटांची ऑर्डर दिली जाते. मात्र अचानक आलेल्या बिन बुलायेमुळे नातेवाईकांना भुर्दंड बसतो. अशावेळी या मंडळींना विचारणा होऊ शकते.

काय आहे कलम 447
एखाद्याच्या कार्यात आमंत्रण नसताना जाऊन सहभाग घेतल्यास संबंधित व्यक्तीस तीन महिने कारावास किंवा पाचशे रुपये दंड अथवा दोन्हीही शिक्षा होऊ शकते. सध्या लग्नसराईचा हंगाम सुरु असून, शहर परिसरातील लग्न कार्यालये, मोठ-मोठे लॉन्स लग्नतारखांना बुक झाली आहेत. कोरोनानंतर लग्न धडाक्यात लावण्याचा ट्रेन्ड पुन्हा सुरु झाला आहे. मोठ्या संख्येने येणारी वर्‍हाडी मंडळी पाहता कार्याच्ूया धामधुमीत कुणाचीच ओळख नसलेला, आमंत्रणाव्यतिरिक्त आणि केवळ जेवणासाठी आलेले आगंतुक भोजनाचा यथेच्छ आस्वाद घेतात.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news