लोणावळा : पावसाळा सुरू होताच लोणावळा आणि परिसरातील एकवीरा देवी, भाजे लेणी, लोहगड, विसापूर, टायगर पॉईंट, पवना डॅम यासारख्या पर्यटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळे होणार्या वाहतूककोंडी व अपघातांची शक्यता लक्षात घेता पुणे ग्रामीण पोलिस व जिल्हा प्रशासनाने वाहतूक मार्गात महत्त्वपूर्ण बदल करत पर्यायी मार्गांची घोषणा केली आहे. हे बदल 31 ऑगस्ट 2025 दरम्यान लागू असणार आहेत.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी या संदर्भातील अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये भाजे गावाकडून मळवली- कार्ला मार्ग बंद करण्यात आला आहे. पर्यटकांसाठी पाटण ब्रिज-देवले-औंढे ब्रिज-कुसगाव-लोणावळा-जुना हायवे/एक्सप्रेस वे हा पर्यायी मार्ग देण्यात आला आहे. तसेच, औंढे-देवले रोडने मळवली-भाजे येथे येणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. यासाठी औंढे-लोणावळा-कार्ला फाटा-मळवली- भाजे हा पर्यायी मार्ग असणार आहे. मळवली व सदापूरहून कार्ला बाजूकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. पर्यटक मळवली-सदापूर-वाकसई फाटा-जुना हायवे या पर्यायी मार्गाने जावू शकतात.
तसेच, वाकसई फाटा ते मळवली मार्ग बंद करण्यात आला असून, कार्ला फाटा-मळवली-पाटण-भाजे हा पर्यायी मार्ग देण्यात आला आहे. भाजे ते लोहगड मार्ग वन वे करण्यात आला असून, फक्त भाजे येथून लोहगडाकडे जाणारी वाहनांच परवानगी देण्यात आली आहे.
लोहगडहून बाहेर पडण्यार्या चारचाकी वाहनांसाठी लोहगड-दुधिवरे खिंड-औंढोली-औंढे-कुसगाव-लोणावळा आणि दुचाकी/तीनचाकी वाहनांसाठी वरील मार्ग किंवा पवनानगरमार्गे हायवेचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कार्ला फाटा ते वेहेरगाव या मार्गावर अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. हे सर्व निर्बंध स्थानिक रहिवाशांसाठी लागू राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पर्यटकांनी प्रशासनाने ठरवलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.
पावसाळा सुरू होताच पर्यटकांचा ओघ वाढला असून, लोणावळा परिसरातील पर्यटनस्थळांवर गर्दीमुळे अपघात, वाहतूककोंडी आणि कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नांची शक्यता लक्षात घेता जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी 31 ऑगस्ट 2025 पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. या आदेशात पुणे जिल्ह्यातील लोणावळा परिसरातील एकवीरा देवी, कार्ला लेणी, भाजे लेणी, भाजे धबधबा, लोहगड, विसापूर, तिकोणा किल्ला, टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट, शिवलिंग पॉईंट, पवना धरण या पर्यटनस्थळांचा समावेश आहे. पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांच्या शिफारसीनंतर हे आदेश लागू करण्यात आले आहेत. त्याचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.