

खेड : दुरुस्तीच्या कामासाठी विद्युत खांबावर चढलेल्या २८ वर्षीय कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाला. काम करत असताना अचानक विजेचा धक्का लागुन हा युवक खाली पडला. गुरुवारी (दि. १२) पहाटे सव्वातीन वाजेच्या सुमारास राजगुरुनगर जवळच्या चांडोली परिसरात ही घटना घडली. अजित शिवाजी टाकळकर (वय २८, रा. टाकळकरवाडी, ता. खेड) असे या कंत्राटी कामगाराचे नाव आहे. या घटनेबाबत खेड पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद झाली आहे. (Pune News Update)
या घटनेची माहिती अशी की, चांडोली गावाच्या हद्दीत पुणे-नाशिक महामार्ग बाह्यवळण रस्त्यालगत असणाऱ्या रोहित्रावर बिघाड झाला होता. त्याची दुरुस्ती करण्यासाठी पहाटे सव्वातीन वाजेच्या सुमारास अजित टाकळकर खांबावर चढला होता. अचानक विजेचा जोरदार धक्का बसल्याने तो थेट भीमा नदीपात्रालगत असणाऱ्या गाळात कोसळला. इतर सहकाऱ्यांनी त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलवले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
अजित टाकळकर हा राजगुरूनगर उपविभागामध्ये गेली पाच वर्षे कंत्राटी कामगार म्हणून तुटपुंज्या वेतनावर काम करीत होता. कुटुंबातील तरूण व कर्ता मुलगा मृत पावल्याने दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या मृत्यूची माहिती कळल्यावर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.