

कोंढवा : शेतकर्यांना युरिया खत हवे असेल, तर त्यासोबत अन्य खते विकत घ्यावी लागतात. हवेली तालुक्याच्या पूर्व भागातील काही कृषी सेवा केंद्रचालकांकडून ही सक्ती केली जात असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. विक्री होत नसलेली खते खपविण्यासाठी खतविक्रेत्यांकडून हा फंडा वापरला जात असल्याचे शेतकर्यांनी सांगितले. महंमदवाडी, उंड्री, वडाचीवाडी परिसरात नागरीकरण मोठ्या प्रमाणावर झाले असले, तरी काही शेतकर्यांनी अद्यापही शेती जपली आहे. ते भाजीपाला, फळभाज्या आदींचे उत्पादन घेत आहेत.
यासाठी लागणार्या खतांचे दर सध्या गगनाला भिडले आहेत. मात्र, युरिया खताचे दर शेतकर्यांच्या आवाक्यात असून, ते घेण्याकडे शेतकर्यांचा सध्या कल आहे. मात्र, हे खत घेण्यासाठी परिसरातील कृषी सेवा केंद्रचालकांकडून अन्य विक्री न होणारी खते घेण्याची सक्ती केली जात असल्याचे शेतकर्यांनी सांगितले, तर अशी कोणतीही सक्ती केली जात नसल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे.
राज्यात सध्या शेतकर्यांना कोणीही वाली उरला नाही. व्यापारी, औषधविक्रेते, बियाणेविक्रेते, विमा कंपन्यांकडून फसवणूक होत आहे. हक्काचा पीक विमा मिळविण्यासाठी देखील विविध अडचणींना सामोरे जावे लागते आहे. विक्रेते बोगस बियाणे देऊन शेतकर्यांवर दुबार खर्चाची वेळ आणत असल्याने अतोनात नुकसान होत असल्याचा आरोप शेतकर्यांनी केला आहे.
हवेली तालुका कृषी अधिकारी मारुती साळे म्हणाले की, युरिया घेताना एखादा दुकानदार फसवणूक करीत असेल, तर त्याबाबत संबंधित शेतकर्यांनी कृषी अधिकार्यांकडे तातडीने तक्रार करावी. या अगोदरही हवेली तालुक्यातील खतविक्रेत्यांना समज देण्यात आली असून, काहींवर कारवाईदेखील करण्यात आली आहे. दुकानांमध्ये युरिया खत शिल्लक असेल, त्यापासून शेकर्यांना वंचित ठेवता येणार नाही.
युरिया खत हवे असेल, तर '10 : 2626' हे खत घ्यावे लागेल, अशी सक्ती विक्रेत्यांकडून केली जात आहे. ज्या खताची गरज नाही, ते घरी आणून करणार काय? ही सरळ सरळ शेतकर्यांची फसवणूक आहे. फसवणूक करणार्या दुकानदारांवर प्रशासनाने कारवाई करावी.
-प्रकाश तरवडे, शेतकरी, महंमदवाडीकोणतेही खत घेण्यासाठी शेतकर्यांना सक्ती केली जात नाही. मुळात युरिया खताचा सध्या तुटवडा आहे. त्यामुळे एका आधार कार्डावर एक युरिया खाताची गोणी दिली जात आहे. दुकानात आलेल्या सर्व शेतकर्यांना मागणीनुसार खते मिळण्यासाठी नेहमीच प्रयत्न केला जात आहे.
-गौतम चव्हाण, खत विक्रेते, हडपसर