पुणे : विचारधारा नसेल, तर समाज अनियंत्रित: खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे प्रतिपादन

पुणे : विचारधारा नसेल, तर समाज अनियंत्रित: खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे प्रतिपादन
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा: 'समाजात विचारधारा नसेल तर समाज अनियंत्रित असतो. विचारधारा समाजाचे मन आणि मनगट मजबूत करते. आजचे पुरस्कारार्थी समाजाला मानवता आणि विचारधारा देणारे असून, ते खर्‍या अर्थाने राष्ट्राची संपत्ती आहेत. ते राष्ट्र उभारणीचे काम करीत आहेत,' असे प्रतिपादन अभिनेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.

हडपसर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने रमा एकादशी ते भाऊबीज यादरम्यान 'दिवाळी पहाट संगीत महोत्सव' आयोजित केला जातो. या महोत्सवामध्ये कै. बाबूराव श्रीपती तुपे व कै. अशोकराव बापूसाहेब मगर यांच्या स्मरणार्थ 'त्रिनेत्र कृतज्ञता' पुरस्काराने ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके व शहीद भगतसिंग जीवनरक्षक फाउंडेशनचे अध्यक्ष बच्चूसिंग टाक यांना सन्मानित करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी आमदार चेतन तुपे, माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, महादेव बाबर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रसन्न जगताप, योगेश सासणे, डॉ. शंतनू जगदाळे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष नीलेश मगर, खजिनदार रामदास तुपे, सचिव नाजीम शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

या वर्षी पंडित उपेंद्र भट यांचे संतवाणी, ज्येष्ठ संगीतकार व गायक श्रीधर फडके यांचे 'फिटे अंधाराचे जाळे', शास्त्रीय गायक अजित कडकडे यांचा 'कैवल्याच्या चांदण्याला', रमा कुलकर्णी, मालविका दीक्षित, राहुल जोशी, अजित विसपुते यांचे 'लता मंगेशकर यांच्या स्वर्गीय आठवणी', सलील कुलकर्णी, संदीप खरे यांचे 'आयुष्यावर बोलू काही' आणि कु. अंजली व कु. नंदिनी गायकवाड यांचा 'अवघा रंग एक झाला' या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी चेतन तुपे, प्रा. हरी नरके, बच्चूसिंग टाक यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठानचे अध्यक्ष नीलेश मगर यांनी केले. प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अविनाश तुपे यांनी आभार मानले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news