जरांगेंचे समाधान होतच नसेल, तर आम्ही काय करणार: गिरीश महाजन

जरांगेंचे समाधान होतच नसेल, तर आम्ही काय करणार: गिरीश महाजन

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिले होते. मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने आजपर्यंत जे काही करायचे होते त्याबाबत सर्वकाही केले असल्याचे प्रतिपादन ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. तसेच, मनोज जरांगे यांचे समाधान होतच नसेल, तर आता आम्ही काय करणार? असे देखील महाजन म्हणाले.

पुण्यात विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी महाजन यांनी संवाद साधला. या वेळी मागील वर्षभरात मनोज जरांगे यांचे अनेकवेळा उपोषण आणि आंदोलन झाली. त्यामध्ये ठोस निर्णय घेण्यात सरकार अपयशी ठरले का? त्या प्रश्नावर महाजन बोलत होते. ते म्हणाले, मराठा आरक्षणाच्या बाबतीत 50 वर्षांत कोणी प्रयत्न केले का? मराठा समाजाला आरक्षण देण्याची गरजच काय, हे शरद पवार यांचे विधान आहे, अशा शब्दात पवार यांना टोला लगावला.

'अशाप्रकारे आरक्षण देता येत नाही'

महाजन म्हणाले, आम्ही मराठा समाजाच्या बाजूने आहोत, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता ते आरक्षण देण्याची आमची भूमिका आहे. पण जरांगे यांचे समाधान होतच नसेल, तर आता आम्ही काय करणार? सगेसोयरे यांना पण द्या, मात्र ते न्यायालयामध्ये टिकणारच नाही. तसेच माझ्या माहितीप्रमाणे अशाप्रकारे आरक्षण देता येत नाही. पण त्यामध्ये काही करता येत असेल, तर सरकार निश्चित प्रयत्न करेल, अशी भूमिका त्यांनी मांडली.

राजकीय पोळी भाजण्याचे प्रयत्न

मराठा आणि ओबीसी या दोन्ही समाजात भाजपने वाद लावला, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. त्यावर गिरीश महाजन म्हणाले, आता जो तो त्याची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. ही आंदोलने कशाप्रकारे उभी राहिली आहेत. याबाबत सुप्रिया सुळे यांनादेखील माहिती आहे. मला सध्याच्या परिस्थितीबाबत सांगावेसे वाटते की, दोन समाजात द्वेष, दुही निर्माण होईल, अशा प्रकारची विधाने करू नयेत.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news