

प्रा. अनिल धुमाळ
शिवनगर: नमस्कार, सर्व सभासद बंधू भगिनींनो.. राज्यात 1946-47 साली डॉ. धनंजयराव गाडगीळ, वैकुंठभाई मेहता, पद्मश्री विखे पाटील आदी विचारवंतांनी सहकारी साखर कारखान्याची कल्पना उचलून धरली. त्याला माननीय यशवंतराव चव्हाण यांनी सर्वतोपरी मदत केली.
परिणामी 1950 ला विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पहिला सहकारी साखर कारखाना लोणी प्रवरानगर येथे सुरू झाला. त्याच धरतीवर माळेगाव परिसरातील शेतकर्यांनी 5 जुलै 1954 ला 61 सभासदांचे प्रवर्तक मंडळ तयार करून त्याच्या मुख्य प्रवर्तकपदी रावबहादूर दादासाहेब शेंबेकर यांची निवड केली. (Latest Pune News)
कारखान्याचे प्रथम गळीत 25 नोव्हेंबर 1957 ला सुरू झाले. त्या हंगामात 1 लाख 5 हजार 71 मेट्रिक टन उसाचे गळीत होऊन 11.63 सरासरी साखर उतार्याने 1 लाख 17 हजार 962 साखर पोत्यांचे उत्पादन मिळाले. त्यावेळी पोत्याचा दर सरासरी 101 रुपये 63 पैसे मिळाला तर उसाचा दर 42 रुपये प्रतिटन दिला, तेव्हापासून खर्या अर्थाने माझी सुरुवात झाली. तदनंतर माझी प्रतिदिन गाळप क्षमता 1000 मेट्रिक टनापासून आजअखेर 7 हजार 500 मे टनापर्यंत येऊन पोहोचली.
दरम्यानच्या काळात अनेक प्रकल्पाच्या माध्यमातून माझा विस्तार होत गेला; मात्र हे करत असताना माझे मालक असलेल्या सुज्ञ सभासदांच्या माध्यमातून आजअखेरपर्यंत तत्कालीन सर्वच चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक मंडळाने माझी चांगली देखभाल केली. जर कुठे कुणी चुकीचे वागत असेल तर सभासद त्यांना धारेवर धरत.
दरम्यानच्या काळात मला केंद्र तसेच राज्य शासन आणि इतर सहकारी संस्थांच्या माध्यमातून अनेक पुरस्कार मिळाले. राज्यात माझी उच्चांकी ऊस दर देणारा अग्रगण्य कारखाना म्हणून ओळख निर्माण झाली.
माझ्या माध्यमातून माझ्या सभासदांच्या मुला- मुलींचे वैवाहिक सोहळे पार पाडण्यासाठी शिवतीर्थ हे मंगल कार्यालय झाले, शिवनगर विद्या प्रसारक मंडळाची नामांकित शिक्षण संस्था निर्माण झाली. त्या माध्यमातून माझ्या गोरगरीब ऊस उत्पादक शेतकर्यांची हजारो मुले उच्चशिक्षित होऊन देशासह परदेशात उच्च पदावर कार्यरत झाली, त्याचा मला सार्थ अभिमान आहे.
मी अनेक निवडणुका पाहिल्या आहेत. सर्वच निवडणुकांच्या माध्यमातून लोकशाही जोपासत सभासदांनी कधी सत्ताधाऱ्यांना धक्का देत तर कधी विरोधकांना साथ देत माझी काळजी घेतली. आता मात्र पुन्हा माझ्यावर सत्ता मिळवण्यासाठी निवडणूक सुरू आहे. मात्र कालपरत्वे निवडणुकीचे रंग बदलत चालले आहेत; मात्र माझा मालक असलेला सभासद अत्यंत हुशार, चतुर व स्वाभिमानी आहे, तो कदापिही माझी हेळसांड होऊ देणार नाही याची मला खात्री आहे.
माझा नावलौकिक असा आहे, जेणेकरून राज्याचे उपमुख्यमंत्री माझे कारभारी होऊ पाहत आहेत तर दुसरीकडे 85 वर्षांचे वयोवृद्ध ज्यांना माझ्यामुळेच सहकारमहर्षी ही पदवी प्राप्त झाली ते आणि त्यांचे शिष्य रिंगणात आहेत. ज्यांच्या नावाने देशासह राज्यात माझी ओळख आहे असे ज्येष्ठ नेते खासदार साहेब यांच्या पॅनेलने देखील निवडणुकीत रंगत आणली आहे. दुसरीकडे कष्टकरी शेतकरी या निवडणुकीत आपली ताकद आजमावण्याचा प्रयत्न करत आहेत.
असो, आजपर्यंतचा माझा इतिहास पाहता माझ्या मालकाने माझी कधी अवहेलना होईल, असे संचालक मंडळ निवडून दिले नाही, याचा मला सार्थ अभिमान आहे. पाहूयात... प्राप्त परिस्थितीत माझा मालक कोणाला माझी सेवा करण्याची संधी देईल. याची उत्सुकता आपल्याप्रमाणे मलादेखील लागली आहे.
माझी इच्छा व अपेक्षा
आज माझे वय जवळपास 70 वर्षे आहे. या कालावधीत मी अनेक चढ-उतार, जय-पराजय, गुणगौरव पाहिले आहेत. माझा राज्यासह देशात जसा नावलौकिक आहे, त्याप्रमाणे माझे मालक असलेल्या सुज्ञ ऊस उत्पादक शेतकरी सभासदांनी याही निवडणुकीत योग्य तो निर्णय घेऊन माझ्या नावलौकिकाला साजेसा कारभारी निवडावा, एवढीच काय ती माझी इच्छा व अपेक्षा आहे.