वेल्हे: राजगड तालुक्यातील राजगड किल्ला, मंजाई आसनी, सुरवड, भागीनघर तसेच भोर तालुक्यातील कुरुंजी, करंदी, कांबरे या गावांकडे जाणार्या मार्गावरील कोदवडी येथील पूल अत्यंत धोकादायक बनला आहे.
या पुलावरून प्रवास करणार्या स्थानिक आणि पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पुलाच्या खराब स्थितीमुळे प्रशासनाकडून फलक लावून तेथील वाहतूक बंद करण्याची तयारी सुरू आहे. कोदवडी येथील हा जुना पूल सध्या गंजलेल्या लोखंडी सळया, तडे गेलेले आधारस्तंभ आणि कमकुवत संरचनेसह उभा आहे. पावसाळ्यात नदीच्या प्रवाहामुळे पूल आणखी कमजोर झाला आहे. पूल कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे. (Latest Pune News)
वाहतूक सुरू; धोका वाढतोय
दररोज स्थानिक आणि पर्यटक या पुलावरून मोठ्या प्रमाणावर प्रवास करतात. पावसाळ्यात पाण्याची पातळी वाढल्यास अपघाताची शक्यता दुपटीने वाढते. अलीकडेच मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे पूल कोसळून झालेली दुर्घटना ताजी असतानाच कोदवडी पूलसुद्धा गंभीर स्थितीत आहे.
तक्रारी असूनही दुर्लक्ष
आस्कवडीचे माजी सरपंच भाऊसाहेब दसवडकर म्हणाले, ‘हा पूल अनेक वर्षांपासून धोकादायक अवस्थेत आहे. आम्ही वारंवार तक्रारी केल्या, पण अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना झाली नाही. मोठा अनर्थ घडण्याआधी प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत.’
प्रशासनाची हालचाल सुरू
तहसीलदार निवास ढाणे यांनी संबंधित विभागाला तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पुणे जिल्हा परिषदेचे उपअभियंता विलास कुलकर्णी यांनी सांगितले की, लवकरच पुलावर फलक लावण्यात येणार असून, वाहतूक बंद केली जाईल.