

पुणे; पुढारी वृत्तसेवा : खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात कारागृहात असलेल्या तसेच पत्नीपासून विभक्त राहणार्या पतीला 50 हजार रुपये पाठवायचे आहेत. त्या पैशांची व्यवस्था कर, असे म्हणत विनयभंग करणार्या पतीच्या दोन मित्रांवर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश मांगड (29) आणि चेतन सरोदे (29, दोघेही रा. वाघजाईनगर, कात्रज) यांच्यावर खंडणी आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महिलेने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला पतीपासून विभक्त राहते. तिचा पती खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात कारागृहात आहे. दि. 13 आणि 19 जून रोजी दोन्ही आरोपींनी महिलेला रस्त्यात गाठले. मांगड याने तिला तुझ्या नवर्याला 50 हजार रुपये पाठवायचे आहेत. त्या रकमेची लवकर सोय कर, अशी धमकी दिली. सरोदे याने विनयभंग केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार कात्रज येथे तसेच संतोषनगर येथे घडला. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक धीरज गुप्ता तपास करीत आहेत.