पुणे : शंभर कोटींच्या कराची फसवणूक; व्यापार्‍यास अटक

पुणे : शंभर कोटींच्या कराची फसवणूक; व्यापार्‍यास अटक

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कर चुकविणार्‍या कंपन्यांच्या विरोधात महाराष्ट्र वस्तू आणि सेवाकर विभागाने विशेष तपास मोहिमेंतर्गत रामनारायण वरुमल अग्रवाल या व्यापार्‍यास 630 कोटी रुपयांच्या बनावट पावत्यांद्वारे 110 कोटी रुपयांचे बनावट कर क्रेडिट वापरल्याबद्दल आणि पास केल्याबद्दल अटक केली आहे. विभागाने बनावट पावत्यांमध्ये गुंतलेल्या करदात्यांच्या विरोधात केलेल्या विशेष मोहिमेचा एक भाग म्हणून मेसर्स अग्रवाल एंटरप्रायझेस आणि इतर कंपन्यांच्या बाबतीत तपासणी करण्यात आली.

अग्रवाल (वय 62 वर्षे) हे 26 बोगस कंपन्या तयार करण्यात सहभागी असल्याचे तपासात निष्पन्न झाले. या कंपन्यांनी 56.34 कोटी रुपयांचे बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट घेतल्याचे आणि 54.64 कोटी रुपयांचे बनावट कर क्रेडिट वस्तू किंवा सेवांचा प्रत्यक्ष पुरवठा न करता पास केल्याचे आढळून आले. या पद्धतीने वस्तू आणि सेवाकर विभागाची फसवणूक केली.

या प्रकरणात बनावट करदात्यांकडून खरेदी इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा केला गेला आणि त्यामुळे महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर कायदा 2017 च्या तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल अग्रवाल यांना अटक करण्यात आली. याप्रकरणी मुख्य न्यायदंडाधिकारी, पुणे यांनी त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. विभागाचे अप्पर राज्य कर आयुक्त धनंजय आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य कर सहआयुक्त दीपक भंडारे यांच्या नेतृत्वाखाली अटकेची कारवाई करण्यात करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news